काँग्रेसचे रेल रोको आंदोलन
By Admin | Updated: June 26, 2014 00:38 IST2014-06-26T00:18:05+5:302014-06-26T00:38:41+5:30
उस्मानाबाद : सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र शासनाने रेल्वेची भाडेवाढ केली. हा प्रकार सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटण्यासारखा आहे.

काँग्रेसचे रेल रोको आंदोलन
उस्मानाबाद : सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र शासनाने रेल्वेची भाडेवाढ केली. हा प्रकार सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटण्यासारखा आहे. ही भाडेवाढ तातडीने मागे घ्यावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने येथील रेल्वे स्टेशनवर जवळपास १० मिनिटे रेल्वे रोखून धरली. यानंतरही मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
केंद्र शासनाने प्रवासी भाडे १४.२ टक्के तर मालवाहतूक भाड्यामध्ये ६.५ टक्के इतकी वाढ केली आहे. भाड्यामध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे देशातील जनतेला ‘अच्छे दिन आऐंगे’ असे स्वप्न दाखविलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. भाववाढ रोखू, महागाई थांबवू असे म्हणणाऱ्या सरकारने त्यांचे खरे रुप दाखविण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी केला. रेल्वे भाडेवाढीपाठोपाठ गॅस, पेट्रोल, डिझेल, साखर व इतर वस्तूंचे दर वाढविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हा सर्व प्रकार सर्वसामान्यांना महागाईच्या खाईमध्ये लोटणारा आहे. हे शासन सर्वसामान्यांचा विचार करणारे नसून धनदांडग्याचे हित साधणारे असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
आंदोलनामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्यासह जि.प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जि.प. सदस्य धिरज पाटील, लक्ष्मण सरडे, शमियोद्दीन मशायक, विलास शाळू, बाळासाहेब शिंदे, राजाभाऊ शेरखाने, जि.प. सदस्य सुधाकर गुंड, तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, विजयकुमार सोनवणे, माजी जि.प. सदस्य बिभीषण खामकर, धनंजय राऊत, दर्शन कोळगे, शीला उंबरे (पेंढारकर) यांच्यासह कार्यकर्ते या रेल रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
दोन कार्यकर्ते एकेरीवर
काँग्रेसच्या वतीने रेल्वे भाडेवाडीच्या निषेधार्थ रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन संपल्यानंतर सर्व पदाधिकारी रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असतानाच काँग्रेसचे दर्शन कोळगे आणि धनंजय राऊत यांच्यामध्ये अचानक बाचाबाचीला सुरुवात झाली. आजूबाजूचे कार्यकर्ते जवळ येईपर्यंत हे दोघेही एकेरीवर आले. त्यानंतर कोळगे यांच्या गाडीची काचही फोडली गेली. या दोघांमधील वादा-वादी विकोपाला जाऊन धराधरीही झाली. हा अशोभनीय प्रकार पाहिल्यानंतर बाजूलाच उभे असलेले पदाधिकारी धावून गेले आणि दोघातील भांडण मिटविले.
राऊत यांनी गाडी फोडली
विश्वासअप्पा शिंदे यांच्यासोबत माझे बोलणे सुरू असतानाच बाजूला असलेल्या धनंजय राऊत हे मागील कुरापत काढून अंगावर धाऊन आले. त्यानंतर माझ्या गाडीची काचही फोडली. राऊत अंगावर धावून आल्यामुळे धराधरी झाली. हा सर्व खटाटोप वरिष्ठांच्या पुढे-पुढे करण्यासाठीच असल्याचे दर्शन कोळगे यांनी सांगितले.
कोळगेंनीच दगड मारला
पक्षांतर्गत कारणावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. मात्र दर्शन कोळगे यांनी मला दगड फेकून मारला. हा दगड हातावर लागून तो त्यांच्या गाडीवर पडला आणि काच फुटली. भांडण चमकोगिरीमुळे झाले, असा आरोप केला जात असला तरी त्यात काही तथ्य नाही. आता आमच्यातील भांडण मिटले आहे, असे काँग्रेसचे धनंजय राऊत यांनी सांगितले.