नोटबंदीविरोधात काँग्रेस-राकाँ रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 23:37 IST2017-01-09T23:36:50+5:302017-01-09T23:37:52+5:30
बीड : नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वतंत्र आंदोलने झाली.

नोटबंदीविरोधात काँग्रेस-राकाँ रस्त्यावर
बीड : नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वतंत्र आंदोलने झाली. राकाँच्या वतीने मोर्चा काढण्यात आला तर काँग्रेसने थाळीनाद करून लक्ष वेधले. यावेळी काँग्रेस-राकाँचे मातब्बर नेते रस्त्यावर उतरले होते. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. नोटाबंदीमुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार वर्ग व सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. पोलीस बंदोबस्त तैनात होता. (प्रतिनिधी)
केज येथे रास्ता रोको
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी उपसभापती नेताजी शिंतोडे, सुनील घोळवे, ज्ञानेश्वर चवरे, प्रकाश राऊत, राहुल गदळे, पंडित सावंत, धनसंपत ठोंबरे, अतुल इंगळे , भागवत ठोंबरे, लिंबराज फरके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संखेने हजर होते. घोषणांनी परिसर दणाणला. यावेळी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
शिरूरमध्ये राकाँचा मोर्चा
येथे राकाँतर्फे जयदत्त धस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीयीकृत बँकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिजामाता चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. नामदेव शिंदे, शेख महेबूब, मिथुन डोंगरे यांची भाषणे झाली. कल्याण तांबे, उपनगराध्यक्ष बाबुराव झिरपे, दत्ता पाटील, शेख अन्वर, भीमराव गायकवाड, गणेश भांडेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. तीन बँकांच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. यावेळी चोख बंदोबस्त होता.