उदगीरसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी
By Admin | Updated: June 11, 2014 00:27 IST2014-06-10T23:56:23+5:302014-06-11T00:27:48+5:30
चेतन धनुरे , लातूर लोकसभेच्या रणधुमाळीपूर्वीच उदगीर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मार्चेबांधणी सुरु झाली आहे़

उदगीरसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी
चेतन धनुरे , लातूर
लोकसभेच्या रणधुमाळीपूर्वीच उदगीर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मार्चेबांधणी सुरु झाली आहे़ अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवारांची कमी नाही़ त्यामुळे कधी कोणाचा नंबर लागेल याचा नेम नाही़ दहा वर्षांपासून हा मतदारसंघ आघाडीत राकाँच्या वाट्याला आला आहे़ परंतु, यावेळी चित्र पालटले असून, काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेत आपले बळ दाखवून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत़ तर दुसरीकडे भाजपात दोन गट पडले असून, एक गट विद्यमान आमदारांना डावलण्याच्या प्रयत्नात आहे़
उदगीर मतदारसंघाने सातत्याने कूस बदलली आहे़ मागील चार निवडणुकांवर नजर टाकली असता काँग्रेस, भाजपा, राकाँ अन् आता पुन्हा भाजपा असा मतदारांनी कौल दिला आहे़ त्यामुळे यावेळची लढतही रंगतदार होईल. मागील निवडणुकीत राकाँचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांना १७,२७७ मतांनी नमवून भाजपाचे डॉ़सुधाकर भालेराव विजयी झाले होते़ परंतु, दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे़ राष्ट्रवादीचा ‘हुकूमी’ एक्का असलेल्या माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी काँग्रेसचा ‘हात’ हातात घेतला आहे़ त्यामुळे राष्ट्रवादीचे बळ या मतदारसंघात काहीअंशी घटले आहे़ नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली आहे़
यावेळी हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी काँग्रेसची मंडळी जोरदार प्रयत्न करीत आहे़ विधानसभेला आघाडी झालीच तर एका छुप्या ‘तहा’नुसार अहमदपूरची जागा राष्ट्रवादीला सोडून उदगीर पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसमधून हालचाली सुरु आहेत़ राकाँही उदगीरची ‘पडेल’ जागा सोडून विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी अहमदपूर पदरात पाडून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही़ आघाडीत जर हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला तर प्रा़रामकिशन सोनकांबळे, माजी नगराध्यक्षा उषा कांबळे यांची नावे उमेदवारीसाठी प्रामुख्याने पुढे असतील़
राष्ट्रवादीकडून गतवेळचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांचे नाव पुन्हा चर्चेत येत आहे़ राकाँचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे यांनी सातत्याने कार्यकर्त्यांशी संपर्क ठेऊन या जागेवर आपला दावा ठोकला आहे़ तर याच भागातील माजी सभापती मधुकर एकुर्केकर यांचाही राकाँकडून दावा सुरु आहे़
दरम्यान, पदाधिकारी निवडीवरुन लोकसभेपूर्वीच भाजपातील सुंदोपसुंदी उघड झाली़ मुंडे समर्थक गटातील माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी विद्यमान आमदार डॉ़सुधाकर भालेराव यांना विरोध केला होता़ लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोहोंनीही ‘आमच्यातील वाद संपला’, असे जाहीर करुन गळ्यात गळे घातले असले तरी, अंतर्गत खदखद अजूनही संपली नाही़ पडद्याआडून भालेरावांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ मतदारांच्या सतत संपर्कात असलेले भालेराव आपला दावा मागे घेण्याची स्थिती नाही़
दुसरीकडे भाजपाचे खासदार डॉ़सुनील गायकवाड यांचे पुतणे विश्वजीत गायकवाड यांच्यासाठीही मोर्चेबांधणी सुरु आहे़ लोकसभेसाठी प्रयत्न केलेल्या डॉ़अनिल कांबळे शेल्हाळकर हेही भाजपाकडून इच्छुक आहेत़ तर उद्योजक मदन गायकवाड यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र मोर्चेबांधणी उदगीरसाठी सुरु केली आहे़
२००९ : प्रमुख २ उमेदवारांची मते...
भाजपसुधाकर भालेराव ७३,८४०
राकाँमच्छिंद्र कामत ५६,५६३
इच्छुकांचे नाव पक्ष
सुधाकर भालेराव, अनिल कांबळे भाजपा
संजय बनसोडे, मच्छिंद्र कामत राकाँ
रामकिशन सोनकांबळे, उषा कांबळे काँग्रेस मदन गायकवाड (स्वतंत्र)