६ पंचायत समित्यांवर काँग्रेसचा झेंडा...

By Admin | Updated: September 15, 2014 00:31 IST2014-09-15T00:24:36+5:302014-09-15T00:31:44+5:30

लातूर : नवीन आरक्षणानुसार सभापती व उपसभापतींच्या निवडी रविवारी झाल्या.

Congress flag on panchayat samiti ... | ६ पंचायत समित्यांवर काँग्रेसचा झेंडा...

६ पंचायत समित्यांवर काँग्रेसचा झेंडा...

लातूर : नवीन आरक्षणानुसार सभापती व उपसभापतींच्या निवडी रविवारी झाल्या. लातूर जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांपैकी ६ सभापती काँग्रेसचे झाले आहेत. भाजपा व राष्ट्रवादीला प्रत्येकी २ पंचायत समित्यांवर सभापतीपद मिळाले आहे. शिवसेनेला मात्र एकाही पंचायत समितीत सभापतीपदावर स्थान मिळाले नाही. लातूर, उदगीर, रेणापूर, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती काँग्रेसचेच आले आहेत. औसा पंचायत समितीचे सभापतीपद काँग्रेसकडे असून, उपसभापतीपद राष्ट्रवादीकडे आले आहे. देवणी मात्र भाजपाकडे आली असून, समान मते मिळाल्याने सभापती व उपसभापतीपदाची लॉटरी भाजपला मिळाली आहे. शिरूर अनंतपाळचे सभापतीपद भाजपाला मिळाले असून, उपसभापतीपद शिवसेनेकडे गेले आहे. जळकोट आणि चाकूर पंचायत समितीवर राष्ट्रवादीने सत्ता मिळविली आहे. चाकूर उपसभापतीपदी काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निलंगा पंचायत समितीच्या सभापतीपदावर काँग्रेस विराजमान झाली असून, राष्ट्रवादीकडे उपसभापतीपद गेले आहे. लातूर, उदगीर, जळकोट, चाकूर आणि अहमदपूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
काँग्रेसला भाजपा, राष्ट्रवादीचा धक्का !
देवणी पंचायत समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बहुमत असताना अनपेक्षितरित्या भाजपा आणि राष्ट्रवादीची युती होऊन काँग्रेसला धक्का देण्यात आला. त्यातच सविता कुमठे यांना नशिबाने साथ दिल्याने सभापतीपदाची माळ कुमठे यांच्या गळ्यात पडली. तसेच उपसभापतीपदी भाजपाचेच तुकाराम पाटील यांची रविवारी बिनविरोध निवड झाली.
देवणी पंचायत समिती ही सहा सदस्यांची असून, तीन सदस्य काँग्रेसचे तर दोन सदस्य भाजपाचे आणि एक राष्ट्रवादीचा आहे. रविवारी तहसीलदार अहिल्या गाठाळ यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती निवडीसाठी बैठक झाली. मागील वेळी काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करून सभापतीपद काँग्रेसला तर उपसभापतीपद राष्ट्रवादीला दिले होते. परंतु, या निवडणुकीत राजकीय जाणकारांचा अंदाजही फोल ठरवत भाजपा आणि राष्ट्रवादीने युती केली. या निवडीवेळी राष्ट्रवादीचे सदस्य तथा माजी उपसभापती यशवंत पाटील यांनी भाजपासोबत युती केल्याने काँग्रेसला जबर धक्का बसला.
सभापती पदाच्या निवडीसाठी कुमठे आणि काँग्रेसचे संजीव प्रताप रेड्डी यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले होते. राष्ट्रवादीच्या सदस्याने भाजपाला साथ दिल्याने भाजपाच्या कुमठे यांना ३ तर काँग्रेसचे रेड्डी यांना ३ मते मिळाली. समान मते मिळाल्याने अखेर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. सविता कुमठे यांना नशिबाने साथ दिल्याने त्यांच्या नावाची चिठ्ठी निघून सभापतीपदी त्यांची वर्णी लागली.
त्यानंतर उपसभापतीपदासाठी भाजपाचे तुकाराम पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे काँग्रेस गाफिल राहिल्याने हाताने दगाफटका झाला. या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येऊन गावात मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी काम पाहिले.
जळकोट पंचायत समितीच्या सभापती राष्ट्रवादीच्या वनमाला बालाजी फुलारी तर उपसभापती पदी भरत मालुसरे यांची रविवारी बिनविरोध निवड झाली़ पिठासन अधिकारी तथा तहसिलदार अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी झाल्या़ दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले़ पं.स. सदस्या ललिता गवळे, अरविंद नागरगोजे, सोजरबाई सूर्यवंशी, कमलबाई माने आदी सहाही सदस्य उपस्थित होते़
औसा पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या कोमल सूर्यवंशी तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे दिनकर मुगळे यांची रविवारी निवड झाली. या निवडीसाठी भाजपा व शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याची अनुपस्थिती राहिली. विद्यमान सभापतीच गैरहजर राहिल्या.
पीठासन अधिकारी दत्ता भारस्कर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीसाठी बैठक घेण्यात आली. या सभेस १७ पैकी १५ सदस्य हजर होते. सभापतीपदासाठी काँग्रेसच्या कोमल दत्तात्रय सूर्यवंशी व शिवसेनेच्या वर्षा उद्धव गोरे यांनी तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे दिनकर मुगळे, भाजपाचे संदीपान लंगर व पद्माकर चिंचोलकर यांनी उमेदवारी दाखल केली. दरम्यान, चिंचोलकर यांनी माघार घेतल्याने दोन्ही पदांसाठी प्रत्येकी दोन उमेदवार राहिले. सूर्यवंशी यांना ८ तर सेनेच्या गोरे यांना ७ मते मिळाल्याने सभापतीपदी कोमल सूर्यवंशी यांची वर्णी लागली. मुगळे यांनाही ८ तर लंगर यांना ७ मते मिळाल्याने उपसभापतीपदी दिनकर मुगळे यांची निवड झाली. या निवडीवेळी विद्यमान सभापती ठमूबाई आडे व भाजपाच्या चंद्रभागा पवार ह्या गैरहजर राहिल्या. मागील वेळी शिवसेना व भाजपाने राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेचा सभापती तर राष्ट्रवादीचा उपसभापती झाला होता.
रेणापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे प्रदीप राठोड तर उपसभापतीपदी काँग्रेसचेच बाळकृष्ण माने यांची रविवारी मतदानाद्वारे निवड झाली़ या दोन्ही पदासाठी काँग्रेस आणि भाजपाच्या सदस्यांनी नामांकन पत्रे सादर केली होती़
रेणापूर पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीसाठी रविवारी तहसिलदार तथा पिठासन अधिकारी संजय वारकड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़ सभापती पदासाठी काँग्रेसकडून प्रदीप राठोड तर भाजपाकडून संपत कराड यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले होते़ उपसभापती पदासाठी काँग्रेसकडून बाळकृष्ण माने तर भाजपाकडून राजश्री शेरखाने यांनी उमेदवारी दाखल केली होती़ दोन्ही पदासाठी दोन-दोन इच्छुक असल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले़ त्यात प्रदीप राठोड यांना पाच तर संपत कराड यांना तीन मते मिळाली़ त्यामुळे राठोड यांची सभापतीपदी निवड झाली़ उपसभापती पदासाठी बाळकृष्ण माने यांना पाच तर राजर्षी शेरखाने यांना तीन मते मिळाली त्यामुळे माने हे उपसभापतीपदी विराजमान झाले़
यावेळी गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी यमुलवाड, नायब तहसिलदार मनिषा कंपले, कोटुळे, गुडापे, सूर्यवंशी, भांदर्गे यांनी निवडणूकीसाठी सहकार्य केले़ या नुतन पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लालासाहेब चव्हाण, अ‍ॅड़ मोहन शिरसाठ, तुकाराम कोल्हे, विकास कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, अनिल पवार, आबा बनसोडे, जिल्हा परिषद सदस्य आशोक पाटील, सुभाष गायकवाड, शिवकन्या पिंपळे, इंदुताई ईगे, उषा राठोड, गोविंद पाटील, लक्ष्मण माळी यांनी सत्कार केला़
निलंगा पंचायत समितीच्या सभापतीपदी चमनबाई हुलसुरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे राजकुमार चिंचनसुरे यांची निवड झाली़ दोन्ही पदासाठी भाजपा उमेदवारांना प्रत्येकी दोन मतांनी पराभव पत्कारावा लागला़
निलंगा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी रविवारी पिठासन अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली़ यावेळी निटुर गटातील काँग्रेसच्या चमनबाई हुलसुरे आणि भाजपाच्या माया पाटील यांनी सभापतीपदासाठी नामनिर्देशनपत्र सादर केले़
उपसभापती पदासाठी विद्यमान राष्ट्रवादीचे उपसभापती राजकुमार चिंचनसुरे आणि भाजपाकडून मुरलीधर अंचुळे यांनी नामांकनपत्र सादर केले़ यावेळी सभापतीपदासाठीच्या हुलसुरे यांना १० तर पाटील यांना ८ तसेच उपसभापतीसाठीचे चिंचनसुरे यांना १० तर अंचुळे यांना ८ मते पडली़ मनसेतून बालाजी गजभार यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता परंतू तो अवैध ठरला़ काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत नसल्याने दुसऱ्यांदाही राष्ट्रवादीचे चिंचनसुरे यांना उपसभापतीपद देणे भाग पडले़ या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला़
उदगीर पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनीता शिवकुमार हाळे यांची तर उपसभापती ज्ञानोबा प्रभुराव गोडभरले यांची रविवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे़
उदगीर पंचायत समितीच्या सभागृहात पीठासन अधिकारी तथा उदगीरचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सदस्यांची विशेष बैठक पार पडली़ सभापती पदासाठी सुनीता हाळे व केरुबाई केंद्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता़ तर उपसभापती पदासाठी ज्ञानोबा गोडभरले व अ‍ॅड़ वीरेंद्र साकोळकर यांनी उमेदवारी अर्ज दाल केला होता़ ऐनवेळी केरुबाई व अ‍ॅड़ वीरेंद्र साकोळकर यांनी आपली उमेदवारी माघार घेतली़ त्यामुळे सभापती पदी सुनीता हाळे व उपसभापती पदी ज्ञानोबा गोडभरले यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी गजानन शिंदे व गटविकास अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी जाहीर केले़
नुतन सभापती व उपसीापतींचा नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, सुनीता आरळीकर, कल्याण पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा़रामकिशन सोनकांबळे यांनी सत्कार केला़ काँग्रेस कार्यकर्त्यांना या बिनविरोध निवडीचे फटाके फोडून स्वागत केले़
शिरुर अनंतपाळ पंचायत समितीच्या सहा सदस्यांपैकी चार सदस्या महिला असल्याने रविवारी झालेल्या निवडीत महिलांचीच वर्णी लागली़ सभापतीपदी भाजपाच्या मिरा कांबळे तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या संगिता जाधव विराजमान झाल्या़ इकडे अहमदपूर पंचायत समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे अ‍ॅड. राघवेंद्र शेळके तर उपसभापतीपदी काँग्रेसचेच देविदास सूरनर यांची निवड झाली.
शिरूर अनंतपाळचे सभापती पदाचे आरक्षण अनुसुचित जातीतील महिलेस असल्याने भाजपाच्या वतीने मिरा कांबळे आणि काँग्रेसच्या वतीने शितल सोनवणे यांनी नामांकनपत्र सादर केले होते़ उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या संगीता जाधव आणि काँग्रेसच्या मिना बंडले यांनी अर्ज दाखल केला होता़ त्यामुळे निवडीसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले़ कांबळे यांना ४ तर सोनवणे यांना २ मते मिळाल्याने सभापतीपदी मिरा कांबळे यांची निवड झाली़ तसेच उपसभापती पदासाठी सुद्धा चार विरुद्ध दोन असे मतदान झाले़
अहमदपुरात काँग्रेस...
अहमदपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अ‍ॅड़ राघवेंद्र शेळके यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसचेच देवीदास सुरनर यांची निवड करण्यात आली़ १२ सदस्य असलेल्या या पंचायत समितीत काँग्रेसचे ९ तर भाजपाचे ३ सदस्य आहेत़ कुमठा गणातील अ‍ॅड़ राघवेंद्र शेळके यांनी सभापती पदासाठी तर उजना गणातील देविदास सुरनर यांनी उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर केले होते़ अन्य कोणाचेही नामनिर्देशन पत्र सादर झाले नसल्याने अवधाने यांनी ही निवड बिनविरोध झाल्याची जाहीर केले़ या नूतन पदाधिकाऱ्यांचा माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी सत्कार केला़
चाकूर : चाकूर पंचायत समितीत राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत आघाडी केल्याने सभापतीपदी राष्ट्रवादीचे करीमसाब गुळवे तर उपसभापती पदी काँग्रेसच्या शिल्पा कल्याणी यांची बिनविरोध निवड झाली़
सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे करीमसाब गुळवे यांनी तर शिवसेनेकडून निलेश मद्रेवार यांनी नामांकनपत्र दाखल केले़ उपसभापती पदासाठी काँग्रेसकडून शिल्पा कल्याणी तर शिवसेनेकडून निलेश मद्रेवार यांनीच नामांकनपत्र दाखल केले़ शिवसेनेचे मद्रेवार यांनी दोन्हीही पदांसाठीचे नामांकनपत्र मागे घेतल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला निवडीचा मार्ग सुकर झाला़ पीठासन अधिकारी कुलकर्णी यांनी सभापतीपदी करीमसाब गुळवे व उपसभापती शिल्पा कल्याणी यांची निवड जाहीर केली.

Web Title: Congress flag on panchayat samiti ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.