काँग्रेसची तक्रार : निवडणूक आयोगाने मागविला अहवाल
By Admin | Updated: May 6, 2014 16:10 IST2014-05-06T16:10:30+5:302014-05-06T16:10:30+5:30
फैझाबाद : भाजपाच्या जाहीरनाम्यात अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्याला अग्रक्रम नसावा

काँग्रेसची तक्रार : निवडणूक आयोगाने मागविला अहवाल
फैझाबाद : भाजपाच्या जाहीरनाम्यात अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्याला अग्रक्रम नसावा, यासाठी आग्रही राहिलेल्या नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील फैझाबादेत मतांसाठी राम धून आळवली. फैझाबाद येथे प्रचारसभेत मोदी यांच्या मंचावर भगवान रामाचे मोठे ‘पोस्टर’ लावण्यात आले होते. मोदी यांनी प्रत्यक्ष राममंदिर निर्मितीच्या मुद्यावर कुठलेही भाष्य केले नाही; परंतु भाषणादरम्यान वारंवार रामनाम घेतले. त्यांनी प्रचारात धर्माचा वापर केल्याच्या मुद्यावरून काँग्रेस कमालीची आक्रमक झाली असून निवडणूक आयोगाने या सभेचा अहवाल मागितला आहे. अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी याच फैझाबाद मतदारसंघात आहे. येथील भाषणात मोदींकडून सतत रामाचा उल्लेख आला. निवडणुकीत जनतेने जिंकून दिल्यास देशात रामराज्य आणेन , असा दावा मोदींनी केला. मोदी म्हणाले, भगवान रामाच्या या भूमीतील लोक ‘प्राण जाए पर वचन न जाए’ या उक्तीवर विश्वास ठेवतात. सत्तेत असलेल्या पक्षांनी १० कोटी रोजगार निर्माण करण्यात येतील अशी घोषणा केली होती. हे आश्वासन पूर्ण न करणार्यांना ते माफ करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोदी देशात रामराज्य आणण्याची भाषा करीत आहेत. मग त्यांनी गुजरातमध्ये रामराज्य का आणले नाही, गुजरातमध्ये अत्याचारांंचे सत्र अजूनही सुरूच आहे. ते रामराज्याचा वापर फक्त मतांसाठी करीत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसच्या अखिलेश प्रतापसिंह यांनी टीका केली आहे. समाजवादी पार्टी आणि बसपा हे पक्ष लखनौमध्ये शत्रू आणि दिल्लीत मित्र आहेत. ते केंद्रातील सरकार वाचवतात. काँग्रेस त्यांना सीबीआयपासून वाचवते, अशी टीका मोदी यांनी केली.