भाजपा उमेदवाराच्या पतीला काँग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 23:46 IST2017-04-18T23:43:06+5:302017-04-18T23:46:13+5:30
लातूर : लातूर महानगरपालिकेची निवडणूक आता मुद्यावरून गुद्यावर आली

भाजपा उमेदवाराच्या पतीला काँग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण
लातूर : लातूर महानगरपालिकेची निवडणूक आता मुद्यावरून गुद्यावर आली असून, मंगळवारी दुपारी भाजप कार्यकर्त्यावर उकळता चहा फेकून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. यात जखमी झालेल्या विनोद मालू यांना उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हा हल्ला काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर पैसे वाटपाला विरोध केल्यामुळे मारहाणीचा बनाव केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
लातूर महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असून, बुधवारी त्यासाठी मतदान होत आहे. मंगळवारी प्रचारादरम्यान, भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी प्रभाग १६ मध्ये भाजपच्या वतीने निवडणूक लढवीत असलेल्या शितल मालू यांचे पती विनोद मालू यांच्यावर उकळता चहा फेकण्यात आला. शिवाय त्यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप भाजपने केला आहे.
या घटनेत विनोद मालू हे जखमी झाले असून, उपचारासाठी कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे.