लसीकरणादरम्यान उडाला गोंधळ; वाळूज महानगरातील केंद्रांवर नागरिकांमध्ये धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 19:39 IST2021-06-28T19:38:13+5:302021-06-28T19:39:27+5:30
केंद्रावर लस घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून, अनेक नागरिक सकाळपासून लांबच-लांब रांगा लावत आहेत.

लसीकरणादरम्यान उडाला गोंधळ; वाळूज महानगरातील केंद्रांवर नागरिकांमध्ये धक्काबुक्की
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून, बजाजनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील केंद्रावर आणि पंढरपूर येथील केंद्रावर नियोजनाअभावी नागरिकांमध्ये गोंधळ उडाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. बजाजनगर येथील केंद्रावर चार ते पाच पुरुषांसह महिलांना धक्काबुक्की झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नागरिकांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले असले तरी आरोग्य विभागाला लसीकरणासाठी अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने बजाजनगर, वडगाव, सिडको वाळूज महानगर,पंढरपूर, दौलताबाद, वाळूज, रांजणगाव, जिकठाण आदी ठिकाणी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर लस घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून, अनेक नागरिक सकाळपासून लांबच-लांब रांगा लावत आहेत. अशातच १८ वर्षांवरील तरुण-तरुणींनाही लस देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठी गर्दी होत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिक लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत. यावर उपाय म्हणून वाळूजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी शक्कल लढवित लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. या चाचणीनंतर नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रात पाठविले जात आहे. बजाजनगरात जिल्हा परिषद शाळेत सोमवारी लसीकरणासाठी अडीचशे ते तीनशे नागरिकांची गर्दी झाली होती. नंबर लावण्यावरून काही नागरिकांत धक्काबुक्की झाली. यात चार ते पाच पुरुषांसह महिलांनाही धक्काबुक्की झाली. नागरिक व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले. पंढरपूरच्या लसीकरण केंद्रावरही गर्दीमुळे गोंधळ उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
लसीकरणासाठी आदल्या दिवशी टोकण
लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दौलताबाद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे यांनी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना आदल्या दिवशी टोकण देण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरात दररोज १ हजार डोसची आवश्यकता असताना केवळ जवळपास ३०० डोस उपलब्ध होत असल्याने गोंधळ उडत असल्याचे डॉ. बामणे यांनी सांगितले.