रुग्णांचे हाल कायम

By Admin | Updated: May 13, 2014 01:13 IST2014-05-12T23:20:41+5:302014-05-13T01:13:43+5:30

जालना: महिला व बाल रुग्णालयाच्या स्थलांतराचा तिढा सुटता सुटत नसल्याने रुग्णांसह डॉक्टर व कर्मचार्‍यांना जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत.

The condition of the patient persists | रुग्णांचे हाल कायम

रुग्णांचे हाल कायम

 जालना: जिल्ह्यातील एकमेव असलेल्या महिला व बाल रुग्णालयाच्या स्थलांतराचा तिढा सुटता सुटत नसल्याने रुग्णांसह डॉक्टर व कर्मचार्‍यांना जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. स्थानिक प्रशसकीय बैठकीत अनेकदा या मुद्यावर चर्चेच्या फेर्‍या झाल्या, परंतु स्थलांतर होऊ शकले नाही. गांधी चमन परिसरात महिला व बाल रुग्णालयाची निजाम कालीन इमारत आहे. गत दहा ते पंधरा वर्षांत इमारतीची परिस्थिती नाजूक झाली आहे. संबंधित विभागाने ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केले. असे असूनही रुग्णालय स्थलांतरित करण्यास माशी कुठे शिंकत आहे, हा कळीचा मुद्दा बनला आहे. लाल फितीचा कारभार की राजकीय उदासिनता स्थलांतरास आडसर ठरत आहे की काय, असे प्रश्न आता उपस्थित राहू लागले आहेत. दिवसाकाठी शेकडो महिलांवर उपचार, मार्गदर्शन, बालकांवर उपचार, शस्त्रक्रिया येथे होतात. महिन्याकाठी ३०० पेक्षा अधिक महिला प्रसुत होतात. रुग्णालयात असलेल्या अद्ययावत यंत्रणा जुन्या इमारतींमुळे कुचकामी ठरण्याची भीती आहे. जीर्ण इमारतींमुळे येथील रुग्णांना आरोग्यदायी वातावरण मिळण्याऐवजी कोंदट अथवा काही घटना घडते की काय याची भीती बाळगत उपचार घ्यावे लागत आहेत. या रुग्णालयाचे स्थलांतर जिल्हा सामान्य रुग्णालयात होणार अशा वावड्याही अधूनमधून उठत असतात. सामान्य रुग्णालात स्थलांतर झाल्यास ते सर्वार्थाने गैरसोयीचे ठरेल असे कर्मचारी तसेच रुग्णांचे म्हणणे आहे. यावर ठोस बोलण्यास कोणीच तयार नाही. महिला रुग्णालयाचे स्थलांतर करण्याचा अधिकार वरिष्ठांच्या हाती असल्याचे रुग्णालयांतून वारंवार सांगितले जाते. तसा अहवालही वरिष्ठांना सादर झालेला आहे. (प्रतिनिधी) उपसंचालकांच्या भेटीला उलटले दोन महिने उपसंचालकांच्या भेटीला दोन महिने उलटूनही स्थलांतर अद्यापही कागदावरच आहे. आरोग्य उपसंचालक पाटील यांनी जीर्ण इमारत तसेच जीर्ण इमारतीच्या परिसरातच नव्याने बांधण्यात आलेली बाळ अतिदक्षता विभागाच्या इमारतीची पाहणी केली. नवीन इमारतीत महिला व बाल रुग्णालय हलविण्यास काही हरकत नाही अशीही चर्चाही झाली. बाळ अतिदक्षता इमारतीत स्थलांतर ? महिला व बाल रुग्णालाचे स्थलांतर नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत होण्याची दाट शक्यता आहे. तशा हालचालीही सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. इमारत पूर्ण तयार झाली आहे. बसस्थानक व रेल्वेस्थानकाच्या मध्यस्थानी हे रुग्णालय असल्याने महिला व बाल रुग्ण तसेच नातेवाईकांनाही सोयीचे आहे.

Web Title: The condition of the patient persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.