चार आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 20:20 IST2016-03-19T20:01:51+5:302016-03-19T20:20:59+5:30
नांदेड :आत्माअंतर्गत कार्यरत बीटीएम, एटीएम आणि सीपी यांचे थकित मानधन त्वरित अदा करावे यासह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १५ मार्चपासून आंदोलन सुरू केले आहे

चार आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळली
नांदेड :आत्माअंतर्गत कार्यरत बीटीएम, एटीएम आणि सीपी यांचे थकित मानधन त्वरित अदा करावे यासह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १५ मार्चपासून आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़
आत्माअंतर्गत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व संगणक आज्ञावली रूपरेषक या पदावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुधारित मानधन द्यावे, असे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद आहे़ त्यानुसार आत्माचे संचालक यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना २०१४-१५ या आर्थिक वर्षापासून सुधारित मानधन देण्याचे आदेश दिले आहेत़ मात्र, प्रकल्प संचालक कार्यालयाने एप्रिल २०१४ पासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन अदा केलेले नाही़ याविरोधात कर्मचाऱ्यांनी प्रकल्प संचालक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे़
वाढीव मानधन त्वरित अदा करावे, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे दरवर्षी मानधनामध्ये १० टक्के वाढ करण्यात यावी आणि मागील सहा महिन्यांपासूनचे थकित मानधन त्वरित अदा करावे, अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत़ प्रकल्प संचालक कार्यालयासमोर के़ वी़ घाटे, एस़ के़ पटवे, एस़ पी़ आचमारे, एल़ एस़ जालावार, एस़ ए़ घुमलवाड, डी़ एल़ सोनटक्के, नितीन दुरूगकर, एस़ पी़ कांबळे, ए़ ए़ पवार, ए़ एम़ बोईनवाड आदी उपोषणास बसले आहेत़ दरम्यान, गुरूवारी उपोषणकर्ते नितीन दुरूगकर आणि एस़ पी़ कांबळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ (प्रतिनिधी)
प्रकल्प संचालक आत्मा यांच्या कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गत चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे़ त्यांच्या आंदोलनाची दखल घेणे, वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविणे आदी बाबी करण्याऐवजी अधिकारी-कर्मचारी रजेवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले़ शुक्रवारी दुपारी कार्यालयात केवळ शिपाई उपस्थित होते़ त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे़
गुरूवारी दोघांची आणि शुक्रवारी चौघांची अशा एकूण सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचाराकरिता शासकीय रूग्णालयात दाखल केले़ यातील दोघांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले़ तर उर्वरित चौघांवर उपचार सुरू आहेत़ यामध्ये के़ बी़ घाटे, एस़ के़ पटवे, सोहेल आणि गुंडावार यांचा समावेश आहे़ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे़