अधिक पैसेवारीमुळे सवलती हुकल्या
By Admin | Updated: May 8, 2014 00:38 IST2014-05-08T00:36:19+5:302014-05-08T00:38:37+5:30
हिंगोली : खरीप हंगामातील जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आढळून आल्याने टंचाईसदृश्य गावांना मिळणार्या सवलतींना हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्यांना मुकावे लागले आहे.

अधिक पैसेवारीमुळे सवलती हुकल्या
हिंगोली : खरीप हंगामातील जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आढळून आल्याने टंचाईसदृश्य गावांना मिळणार्या सवलतींना हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्यांना मुकावे लागले आहे. सन २०१३-१४ च्या खरीप हंगामातील ५० पैशापेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेल्या टंचाई सदृश्य गावांसाठी शासनाने विविध उपाययोजना जाहिर केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सुट देण्यात येणार असून शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगितीही देण्यात आली आहे. या शिवाय वीजबिलात ३३.५ टक्के सुट देण्यात आली असून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफीही देण्यात आली आहे. रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली असून टंचाई जाहीर केलेल्या गावांमधील शेतकर्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित करण्यात येवू नये, असेही या आदेशात म्हटले आहे. या सवलती केवळ ५० पैशांपेक्षा कमी आनेवारी असणार्या गावांसाठी आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ७०७ पैकी एकही गाव येत नाही. सर्व गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे. शासनाच्या या आदेशाचा राज्यातील २८ हजार ९९१ गावांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील यामध्ये एकही गाव नाही. (जिल्हा प्रतिनिधी)