व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची करा चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:54+5:302021-05-05T04:07:54+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : औरंगाबादेत लस कुठे मिळत आहे, अशी विचारणा करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. कारण लसींचा तुटवडा ...

व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची करा चिंता
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबादेत लस कुठे मिळत आहे, अशी विचारणा करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. कारण लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. या सगळ्यात रुग्णालयांचे, डाॅक्टरांचे सतत फोन वाजत आहे आणि कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, आयसीयू बेड मिळेल का, अशी विचारणा होत आहे. दुर्दैवाने त्यांना नकार देण्याची वेळ ओढावत आहे; पण त्याची कोणी चिंता करीत नसल्याची स्थिती आहे. लस घेणे गरजेचे आहेच, पण ती उशिरा मिळाली तरी चालेल; मात्र रुग्णांचा जीव जाऊ नये, यासाठी व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची सुविधा वाढली पाहिजे. आरोग्य यंत्रणेने त्यास प्राधान्यक्रम दिला पाहिजे, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख घसरत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे. परंतु रोज निदान होणाऱ्या रुग्णांत गंभीर रुग्णांची संख्या अधिक राहात आहे. निदान झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनंतर प्रकृती खालावण्याची स्थिती उद्भवत आहे. अशावेळी व्हेंटिलेटर, आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड रुग्णाला लागतो. काही रुग्णालयांत भटकंती केल्यानंतर ऑक्सिजन बेड मिळतो; परंतु व्हेंटिलेटर, आयसीयू बेड शोधूनही मिळत नसल्याची स्थिती आहे. रोज होणाऱ्या मृत्यूत किती रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयू बेड मिळाला नाही, हे यंत्रणेने शोधले पाहिजे आणि त्यावर उपाय केला पाहिजे.
महापालिकेच्या मोबाइल अॅप आयसीयू बेड रिक्त असल्याचे दाखविले जाते, प्रत्यक्षात अनेक रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना आयसीयू बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. ही परिस्थिती असताना आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर, आयसीयू बेड वाढविण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न करताना दिसत नाही. ग्रामीण भागात तर शासकीय यंत्रणेचे अवघे १८ व्हेंटिलेटर आहे. खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर तर नेहमीच फुल्ल असतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा प्राधान्यक्रम नेमक्या कोणत्या गोष्टींना आहे, हेच स्पष्ट होत नसल्याचे म्हटले जात आहे.
-----
डाॅक्टर, परिचारिका, आराेग्य कर्मचारी रुग्णसेवेचा कणा
डाॅक्टर, परिचारिका आणि आराेग्य कर्मचारी हे रुग्णसेवेचा कणा आहेत. उपचार सुविधांबरोबर पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. तरच रुग्णसेवा देणे शक्य होते. अन्यथा, यंत्रसामग्री असूनही ती वापरता येत नाही आणि रुग्णांना काही मदत होत नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
------
२४ तासात ११० फोन
शहरातील एका रुग्णालयाला २४ तासात व्हेंटिलेटर, आयसीयू बेडसाठी तब्बल ११० फोन आले. औरंगाबादसह अन्य जिल्ह्यातील रुग्णांसाठी हे फोन आले होते; परंतु सर्वांना नकारच द्यावा लागला, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
------
तज्ज्ञांनी रुग्णांसाठी सांगितलेला प्राधान्यक्रम
१) व्हेंटिलेटर
२)आयसीयू बेड
३)ऑक्सिजन बेड
४) आवश्यक औषधी
५)रेमडेसिविर इंजेक्शन
६)लसीकरण
-------
एकूण व्हेंटिलेटर- ३३०
रिक्त व्हेंटिलेटर- १
-----
आयसीयू बेड- ६३७
रिक्त आयसीयू बेड- १३१
------
ऑक्सिजन बेड- २,५०८
रिक्त ऑक्सिजन बेड-४५७
------
प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगळे
प्रत्येकाचे प्राधान्यक्रम हे वेगवेगळे असतात. रुग्णांना व्हेंटिलेटर मिळणे, ऑक्सिजन बेड मिळणे, रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा असणे, यास रुग्णालयांचा प्राधान्यक्रम राहील, आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरणे, आरोग्य सुविधा देणे यास आमचा प्राधान्यक्रम असतो. कायमस्वरुपी उपयुक्तता यानुसार आरोग्य सुविधा दिल्या जातात. शासकीय रुग्णालये ही १५० टक्के क्षमतेने रुग्णसेवा देऊ शकतात. रुग्णसंख्येच्या उच्चांकी कालावधीतील मागणीनुसार सुविधा पुरविणे अवघड असतेे पण संतुलित स्वरुपात सुविधा देण्यावर भर असतो.
- डाॅ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक
---
व्हेंटिलेटर, आयसीयूचीच विचारणा
व्हेंटिलटेर, आयसीयू बेड याला सर्वप्रथम प्राधान्यक्रम देणे गरजेचे आहे. सध्या बहुतांश रग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयू बेड, एनआयव्ही, ऑक्सिजनची गरज भासत आहे. देशभरातून मागणी होत असल्याने नवीन व्हेंटिलेटर्स मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. शहरातील कोविड केअर सेंटरमधील तसेच ज्या रुग्णालयात सुविधा नाही, अशा ठिकाणच्या रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयू बेड लागत आहे. शिवाय अन्य जिल्ह्यांतून रुग्ण दाखल होत आहेत. दुसरा प्राधान्यक्रम लसीकरणाला दिला पाहिजे. मास्क वापरणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सला नागरिकांनी प्राधान्य द्यावे.
- डाॅ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष , मराठवाडा हाॅस्पिटल असाेसिएशन
----