भारतीय डॉक्टरांविषयी अनुद्गाराचा आयएमएतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:28 IST2018-04-28T15:23:36+5:302018-04-28T15:28:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन येथे भारतीय डॉक्टरांविषयी जे अनुद्गार काढले. त्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या वतीने तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे.

भारतीय डॉक्टरांविषयी अनुद्गाराचा आयएमएतर्फे निषेध
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन येथे भारतीय डॉक्टरांविषयी जे अनुद्गार काढले. त्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या वतीने तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे.
ज्या पद्धतीने टीका केली तिचे स्वरूप आणि त्यासाठी वापरलेली भाषा, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या प्रमुखास निश्चित शोभनीय नाही. भारतीय डॉक्टर हे त्यांच्या कौशल्यावर जगभर नावाजले जातात. फक्त भारतातच नव्हे, तर अमेरिका, इंग्लंड यासह सर्व जगात त्यांचा आजवर अनेकदा गौरव झालेला आहे. म्हणूनच भारतीय वैद्यकीय जगताची प्रतिमा मलिन करणारी भाषा परकीय भूमीवर वापरणे प्रधानमंत्र्यांकडून अपेक्षित नाही. धनदांडग्यांचे चोचले पुरविणाऱ्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास केलेल्या तीव्र विरोधामुळेच, तर ही भाषा आली नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
आधीच दयनीय अवस्थेत असलेल्या भारतीय सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेच्या दुर्दैवात सरकारने कमी केलेल्या खर्चामुळे भरच पडली आहे. आयएमएने जेनेरिक औषधांचे दुकान आहे. ‘एक कंपनी, एक औषध आणि एकच किंमत’ यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा ठेवणे आणि रुग्णास स्टेन्ट निवडण्याचे स्वातंत्र्य असावे. यासाठीदेखील आम्हीच प्रयत्नशील आहोत. म्हणूनच माननीय पंतप्रधानांची अशी सवंग लोकप्रियतेसाठीची शेरेबाजी प्रामाणिक डॉक्टरांसाठी मानहानिकारक तर आहेच. त्याचबरोबर ती डॉक्टर-रुग्ण सुसंवादासाठीचा अडसर वाढवणारीदेखील आहे. त्यामुळे आयएमएचे अध्यक्ष डॉ. कुलदीपसिंग राऊळ, सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी निषेध केला आहे.