हरीण, मोरांमुळे पिकांवर संक्रांत
By Admin | Updated: August 25, 2014 01:38 IST2014-08-25T00:46:01+5:302014-08-25T01:38:20+5:30
रमेश कोतवाल , देवणी ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय सध्या देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे़ आधीच वरुणराजाने पाठ फिरविल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे़

हरीण, मोरांमुळे पिकांवर संक्रांत
रमेश कोतवाल , देवणी
‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय सध्या देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे़ आधीच वरुणराजाने पाठ फिरविल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे़ त्यात पुन्हा हरीण, मोर व रानडुकरांनी शिवारांत उच्छाद मांडल्याने पिकांवर संक्रांत आली आहे़
देवणी तालुक्यात सिंचनासाठी पाझर तलाव, विहिरी, बॅरेज अशा सुविधा असल्यामुळे याठिकाणची बहुतांश शेती चांगल्या पद्धतीने उत्पादन देते़ परंतु, यंदा वरुणराजाने तालुक्याकडे पाठ फिरविल्यामुळे एकही सिंचन प्रकल्प भरला नाही़ त्यातच विहिरींनीही तळ गाठला आहे़ त्यामुळे शेती पावसाच्या भरवश्यावरच उरली आहे़
सुरुवातीला झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या़ तालुक्यात ३५ हजार ५७३ हेक्टर्स क्षेत्र लागवडीयोग्य आहे़ त्यापैकी २० हजार २५५ हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ तसेच तुरीची पेरणी ७९२६, ज्वारी २०७२, उडीद ९६० तर मुगाची ९४५ हेक्टर्स क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ अधून-मधून बरसलेल्या सरींवर ही पिके कशीबशी तग धरुन आहेत़ सध्या मूग शेंगात येत आहे़ तसेच योसाबीनही फुलोऱ्याकडे मतार्गक्रमण करीत आहे़
शेतकरी हाती किमान लागवडीच्या खर्चाइतके तरी उत्पादन येईल, अशी आशा बाळगत आहेत़ परंतु, पावसापाठोपाठ आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर जनावरे बसली आहेत़ हरीण, मोर व रानडुकरांनी देवणी परिसरात उच्छाद मांडला असून, ते कोवळी पिके फस्त करीत आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पडणाऱ्या शेतीमालावरही सक्रांत आली आहे़ शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे़
गेल्या पंधरा दिवसांपासून शिवारामध्ये हरीण, मोरांचे कळप मोठ्या प्रमाणात वावरत आहेत़ तसेच रानडुकरेही अधून-मधून शेतात फिरताना दिसत आहेत़ ही जनावरे पिके फस्त करीत असल्याने पावसाअभावी मिळणारे अपेक्षित उत्पादनही हाती पडेल की नाही, अशी शंका निर्माण झाल्याचे शेतकरी समद शेख, बसवणप्पा लांडगे, अशोक पाटील, दशरथ बोरुळे, दशरथ कापडे, लहू कोतवाल यांनी सांगितले़