‘समाजकल्याण’तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

By Admin | Updated: March 29, 2016 23:52 IST2016-03-29T23:45:46+5:302016-03-29T23:52:07+5:30

नांदेड : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे़

Competitive Examination Guidance by 'Social Welfare' | ‘समाजकल्याण’तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

‘समाजकल्याण’तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

नांदेड : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे़ ५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमांतर्गत दर मंगळवारी राज्यभरातील तज्ज्ञ अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत़
राज्य समाजकल्याण विभागाच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात़ शाळा, महाविद्यालयातही शैक्षणिक परिसंवाद, व्याख्यान कार्यक्रम राबविले जातात़ यावर्षी डॉ़ आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त विशेष उपक्रम राबविण्याचे आदेश समाजकल्याण विभागाला दिले होते़ जिल्हाधिकाऱ्यांनाही विशेष कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सूचना दिल्या आहेत़
नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी या विषयासंदर्भात विशेष पुढाकार घेवून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला़ याबाबत सहायक समाजकल्याण आयुक्त बी़ एऩ वीर यांना सोबत घेत कार्यक्रमांची आखणी केली़ समाजकल्याण विभागाचे सत्येंद्र आऊलवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, तहसीलदार अशोक थोरबोले यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ त्यानुसार ५ एप्रिलपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे़ जूनअखेरपर्यंत हा उपक्रम नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण सभागृहात राबविण्यात येणार आहे़
राज्यात पहिल्यांदाच असा उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे़ या उपक्रमाचा जिल्ह्यातील एमपीएससी आणि युपीएससी स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असून ती या माध्यमातून पूर्ण होईल, असे सहायक समाजकल्याण आयुक्त वीर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Competitive Examination Guidance by 'Social Welfare'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.