क्रीडा अधिकाऱ्यांविना पाच वर्षांपासून स्पर्धा
By Admin | Updated: August 26, 2014 00:04 IST2014-08-26T00:04:10+5:302014-08-26T00:04:10+5:30
जाफराबाद : तालुक्यास गत पाच वर्षांपासून क्रीडाधिकारीच नसल्याने तालुक्याचे क्रीडाधोरण तसेच विकास खुंटला आहे. क्रीडायुवक सेवा संचलनालय व जिल्हा

क्रीडा अधिकाऱ्यांविना पाच वर्षांपासून स्पर्धा
जाफराबाद : तालुक्यास गत पाच वर्षांपासून क्रीडाधिकारीच नसल्याने तालुक्याचे क्रीडाधोरण तसेच विकास खुंटला आहे.
क्रीडायुवक सेवा संचलनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय व ग्रामीण पायका तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा गेल्या ११ ते ३० आॅगस्ट दरम्यान होत आहेत. तालुका क्रीडाधिकारी स्पर्धेकरिता उपस्थित असणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून सदरील स्पर्धा क्रीडा अधिकाऱ्यांविनाच सुरु आहेत. परिणामी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या उदासिनतेमुळे भावी उदयोन्मुख खेळाडू स्पर्धेपासून वंचित रहात आहेत.
ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्येक खेळात सरस कामगिरी करण्याची क्षमता आहे. परंतु या खेळाडूंना मार्गदर्शनाची गरज आहे. शालेय क्रीडा स्पर्धेत शाळेतील क्रीडा शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम पहात असले तरी प्रत्येक स्पर्धेत आपल्या शाळेचे वर्चस्व टिकून रहावे, यासाठी इतर गुणवंत खेळाडूंचा विचार न करता अन्याय होत असल्याचे अनेक उदाहरण स्पर्धेत पहावयास मिळत आहे. गाव तिथे क्रीडांगण, पंचायतराज क्रीडा अभियान हे शासनाचे खेळाला प्रोत्साहन देणारे उपक्रम आहे. मात्र, या उपक्रमाची माहिती आणि चांगले दर्जेदार खेळाडू निर्माण करण्याकरीता कायमस्वरूपी तालुका क्रीडा अधिकारी देखील आवश्यक आहे. क्रीडा अधिकारी तालुका संयोजक यांच्या भरवशावर गेल्या काही वर्षापासून स्पर्धा घेवून वेळ मारून नेत आहेत. यामुळे स्पर्धेचे आयोजक मनमानी कारभार करून नियमबाह्य गटातटाचे राजकारण स्पर्धेत होताना दिसत आहे. (वार्ताहर)