कंपनीची ‘चाल’ बाजी अजिबात चालणार नाही
By Admin | Updated: November 5, 2016 01:36 IST2016-11-05T01:21:44+5:302016-11-05T01:36:09+5:30
औरंगाबाद : महापालिकेने समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीचा करार रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा महापालिकाच चालवीत आहे.

कंपनीची ‘चाल’ बाजी अजिबात चालणार नाही
औरंगाबाद : महापालिकेने समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीचा करार रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा महापालिकाच चालवीत आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी ब्लिचिंग पावडर मागविणे आदी कारणांचा शोध घेऊन रेकॉर्ड तयार करण्याचे काम कंपनी करीत आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यात आला असून, त्यांची कोणतीच चालबाजी चालणार नसल्याचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.
कंपनी आणि मनपा यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. कंपनी वारंवार पाणीपुरवठा यंत्रणेवर अद्यापही आपलाच ताबा असल्याचा दावा करीत असल्याबद्दल मनपा आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले की, कंपनीने नियुक्त केलेल्या १२४ कर्मचाऱ्यांना मनपाने हस्तांतरित करून घेतलेले आहे. प्रत्यक्षात कंपनीच्या ताब्यात असलेल्या सर्व वस्तू कंपनीने मनपाला दिलेल्या नाहीत. मागील काही वर्षांमध्ये किती पाईपलाईन टाकल्या याचे एमबी रेकॉर्ड त्यांना सादर करायला सांगितलेले आहे, ते त्यांनी सादर केलेले नाही, या सर्व गोष्टी आपल्या ताब्यात आहेत यावरून कंपनी पाणीपुरवठा आपल्या ताब्यात असल्याचा दावा करते. परंतु प्रत्यक्षात ना कंपनीकडे जायकवाडीचा ताबा आहे, ना जलशुद्धीकरण केंद्र त्यांच्या ताब्यात आहेत. या सर्व गोष्टी मनपाच्या ताब्यात आहेत.