‘रुग्णाच्या नातेवाईकांसोबत संवाद आवश्यक’
By Admin | Updated: September 22, 2014 01:11 IST2014-09-22T00:12:51+5:302014-09-22T01:11:40+5:30
औरंगाबाद : अतिदक्षता कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर रात्रंदिवस प्रयत्न करीत असतात.

‘रुग्णाच्या नातेवाईकांसोबत संवाद आवश्यक’
औरंगाबाद : अतिदक्षता कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर रात्रंदिवस प्रयत्न करीत असतात. रुग्णांवर करण्यात येत असलेले उपचार आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती सतत नातेवाईकांना दिली तर पुढील वाद टाळणे शक्य असते, असे प्रतिपादन आयसीयू तज्ज्ञ डॉ. शिवकुमार अय्यर यांनी केले.
एमजीएममध्ये सुरू असलेल्या तीनदिवसीय महाक्रिटीकॉन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर बरे झालेल्या दोन रुग्णांच्या हस्ते परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम.जाधव होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉॅ. शिरीष प्रयाग, डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. आनंद निकाळजे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. अय्यर म्हणाले की, अतिदक्षता विभागात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस प्रशिक्षित असल्या पाहिजेत. नातेवाईकांशी सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे. नातेवाईकांना उपचार पद्धतीची माहिती सांगितल्यास संभाव्य वादविवाद टळतात. डॉ. शिरीष प्रयाग म्हणाले की, रुग्णाला आपल्या गावात अथवा जवळच्या शहरात आयसीयूचे उपचार मिळाले तर गुंतागुंत होत नाही. महाक्रिटीकॉन परिषदेत लहान शहरातील डॉक्टर सहभागी झाले आहेत.
तज्ज्ञांकडून सहभागी डॉक्टरांना सखोल मार्गदर्शन करणे, हा या परिषदेचा उद्देश असल्याचे डॉ. निकाळजे यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुधीर मोघे यांनी केले.
महाक्रिटीकॉन परिषदेचा समारोप
इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसीन आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १८ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या अतिदक्षता विभाग तज्ज्ञांच्या महाक्रिटीकॉन परिषदेचा रविवारी समारोप झाला. या परिषदेत ८०० डॉक्टरांनी सहभाग नोंदविला.
एमआयटी हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल, कमलनयन बजाज हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार रुग्णालय, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल इ. ठिकाणी प्री-कॉन्फरन्स कार्यशाळा आणि चर्चासत्र झाले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ.व्यंकटेश देशपांडे, डॉ. नोहुल पटेल, डॉ. संदीप वायघन, डॉ. योगेश देवगिरीकर, डॉ. प्रशांत वळसे, डॉ. विशाल ढाकणे, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. सचिन सूर्यवंशी, डॉ. योगेश लक्कस आदींनी पुढाकार घेतला.