प्रतिनियुक्त्यांचा अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

By Admin | Updated: May 8, 2014 00:35 IST2014-05-08T00:34:38+5:302014-05-08T00:35:09+5:30

हिंगोली : जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश दिले.

Commissioner's orders for submitting reports of deputations | प्रतिनियुक्त्यांचा अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

प्रतिनियुक्त्यांचा अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

 हिंगोली : जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्त संजीवकुमार जयस्वाल यांनी बुधवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांना येथे दिले. विभागीय आयुक्त जयस्वाल बुधवारी हिंगोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या हस्ते समाधान योजनेंतर्गत विविध प्रमाणपत्रांचे व साहित्याचे वाटप करण्यात आल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेतील अनेक विभागांमध्ये गेल्या तीन ते चार वर्षांपासून काही विशिष्ट अधिकारी मोक्यांच्या पदावर प्रतिनियुक्तीवर आहेत. यासंदर्भात शासनाची काय भूमिका आहे? असा सवाल आयुक्त जयस्वाल यांना केला असता त्यांनी अडचण असल्यास तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्त्या करता येतात; परंतु त्या प्रतिनियुक्त्या एका वर्षापेक्षा अधिक काळ असू नयेत, असे आदेश आहेत. तीन ते चार वर्षांपासून जिल्हा परिषदेत चुकीच्या पद्धतीने प्रतिनियुक्त्या केल्या गेल्या असतील तर याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करा, असा आदेश यावेळी आयुक्त जयस्वाल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे यांना दिला. त्यामुळे आता बनसोडे या प्रकरणी विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करणार की नाही? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. मिनरल वॉटर बाबत मागितला अहवाल हिंगोली शहरात शासनाची कसलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे मिनरल वॉटरचे प्लँट उभारले जात असून त्याद्वारे अशुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याची तक्रार पत्रकारांनी केली. त्यावर आयुक्त जयस्वाल यांनी जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. तसेच गेल्या पाच ते सात वर्षांपासून शहरांसह जिल्ह्यात अनेक इमारती व रस्त्यांची कामे सुरू आहेत. याचीही तक्रार करण्यात आली असता त्याबाबतचाही अहवाल सादर करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात व जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यक ती शासकीय कार्यालये सुरू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी) मोक्याच्या पदावर करण्यात आल्या प्रतिनियुक्त्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या उप कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेले राजाराम चंदाले यांची वसमत येथे शाखा अभियंता पदावर नियुक्त करण्यात आली आहे; परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी जिल्हा परिषदेत नियुक्ती मिळविली आहे. जिल्हा ग्राम विकास यंत्रणेत बीआरजीएफ कक्षात उप अभियंतापदी कार्यरत असलेले डोंबे यांची ग्रामीण पाणी पुरवठा विभागात नियुक्ती आहे; परंतु त्यांनीही गेल्या अनेक महिन्यांपासून बीआरजीएफ मध्ये नियुक्ती मिळविली आहे. त्यांच्याकडे औंढा येथील बीआरजीएफच्या उप अभियंत्यांचाही पदभार आहे. हिंगोली येथील जि.प. बांधकाम विभागातील उप अभियंता कार्यालयातील शाखा अभियंता मुळे यांच्याकडे एनआरएचएम योजनेच्या अभियंत्याचा अनेक महिन्यांपासून पदभार आहे. या शिवाय जिल्हा परिषदेच्या आरोग्य, समाजकल्याण, शिक्षण, कृषी आदी विभागातही मोठ्या प्रमाणात प्रतिनियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यातून पळवाट काढण्यासाठी कामाची गरज म्हणून नियुक्त्या करण्यात आले असल्याचे कारण जिल्हा परिषद प्रशासनाकडून दाखविले जात आहे; परंतु हे कारण अत्यंत तकलादु असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Web Title: Commissioner's orders for submitting reports of deputations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.