रंगपंचमी साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 00:42 IST2016-03-29T00:34:51+5:302016-03-29T00:42:41+5:30
उस्मानाबाद : तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहेत. याचाच परिणाम सोमवारी रंगपंचमी सणावरही दिसून आला.

रंगपंचमी साधेपणाने साजरी
उस्मानाबाद : तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहेत. याचाच परिणाम सोमवारी रंगपंचमी सणावरही दिसून आला. नागरिकांनी अत्यंत साधेपणाने कोरड्या रंगाचा वापर करीत हा सण साजरा केला. दरम्यान, यानिमित्त बहुतांश ठिकाणच्या बाजारपेठा दिवसभर बंद होत्या.
जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असून, गतवर्षी तर सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासूनच अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. सद्यस्थितीत पावणेतीनशेच्या आसपास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याचाच परिणाम सोमवारी साजऱ्या झालेल्या रंगपंचमी सणावर दिसून आला. बालगोपाळांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसून येत होता. हातात पिचकाऱ्या घेऊन एकमेकांवर रंग टाकण्यात चिमुकले दंग होते. परंतु, मोठ्यांनी मात्र पाण्याशिवाय रंगपंचमी साजरी करण्याचा निर्णय घेत कोरडा रंग खेळण्यावर भर दिला. तर अनेकांनी रंगपंचमी न खेळणे पसंद केले. या सणानिमित्त बाजारपेठ मात्र दिवसभर बंद होती.
लोहारा तालुक्यात यावर्षी अल्प पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात १५ दिवसाला टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्याबरोबरच ग्रामीण भागातही तीव्र पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे तालुक्यात बहुतांश ठिकाणी कोरड्या रंगाने पंचमी साजरी करण्यात आली.
कोरड्या रंगाची उधळण
गुंजोटी : दुष्काळी स्थिती व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उमरगा रोटरी क्लब व कैै. शरणाप्पा मलंग विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकांनी कोरड्या रंगाची उधळण करीत रंगपंचमी साजरी केली. यासाठी रोटरीचे सचिव सतीश साळुंके, नितीन होळे, डॉ. संजय अस्वले, संजय कुलकर्णी, संजय ढोणे, संतराम मुरजानी, मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजीत गोबारे, शिवानंद दळगडे आदींनी पुढाकार घेतले.