पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:04 AM2021-08-15T04:04:26+5:302021-08-15T04:04:26+5:30

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज असली, तरी बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्या नसल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पाय ...

Colleges ready for admission to undergraduate, postgraduate courses | पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज

googlenewsNext

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज असली, तरी बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्या नसल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पाय अद्याप महाविद्यालयांकडे वळलेले नाहीत. दुसरीकडे, पदवीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात असून, अजून निकाल जाहीर होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचीही पदवीसारखीच अवस्था आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालात वाढलेल्या गुणांमुळे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा वाढणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमासह व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता १ लाख ४१ हजार १२१ आहे, तर या विभागातील चार जिल्ह्यांमध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थी १ लाख २९ हजार ३२२ आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी असली, तरी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यंदा ‘कट ऑफ’ वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुसरीकडे, विद्यापीठातील विभागांमध्ये (मुख्य परिसर व उपपरिसर) पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता सुमारे २ हजार ४०० जागा आहे.

सध्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नसली, तरी काही नामांकित महाविद्यालयांनी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणी सुरू केलेली आहे. बारावीच्या गुणपत्रिका व टीसी मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रवेश प्रक्रियेला गती येईल. दुसरीकडे, विद्यापीठामार्फत २९ जुलैपासून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ ऑगस्टपासून सुरू होणार असून, विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांच्या परीक्षांना अजून प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा व निकाल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागतील. सप्टेंबर अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरुवात करण्याच्या तयारीत महाविद्यालये व विद्यापीठ आहे.

चौकट.......

आम्ही प्रवेशासाठी तयार आहोत

या संदर्भात देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल अर्दड यांनी सांगितले की, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज आहेत. ३ ऑगस्ट रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला, परंतु अजून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी प्रवेशाची लगबग सुरू झालेली नाही. स.भु. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बालाजी नागटिळक यांनी सांगितले की, गुणपत्रिका नसल्यामुळे सध्या प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची केवळ नोंदणी करून घेतली जात आहे.

Web Title: Colleges ready for admission to undergraduate, postgraduate courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.