उस्मानपुरा येथे महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 14:17 IST2018-08-14T14:13:18+5:302018-08-14T14:17:50+5:30
शिक्षणासाठी शहरात आलेल्या एका २३ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील उस्मानपुरा भागात घडली.

उस्मानपुरा येथे महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या
औरंगाबाद : शिक्षणासाठी शहरात आलेल्या एका २३ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील उस्मानपुरा भागात घडली. सोनल भीमराव गायकवाड असे मृत तरुणीचे नाव असून या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोनल मुळची भोकर (जि. नांदेड) येथील रहिवासी होती. तिचा मिलिंद महाविद्यालयात मानसशास्त्र विषयात एमएसाठी प्रवेश होता. सोनल आणि तिच्या काही मैत्रिणी उस्मानपुरा भाड्याच्या खोलीत राहत असत. सोमवारी सकाळी सोनलच्या सर्व रुममेट बाहेर गेलेल्या असताना तिने खोलीमध्येच छताला गळफास घेत आत्महत्या केली.
रात्री तिच्या रुममेट खोलीवर आल्या असता हा प्रकार त्यांच्या समोर आला. यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह फासावरून काढत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठवला. सोनलच्या आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.