घनसावंगीतही धूसफूस
By Admin | Updated: July 28, 2014 00:58 IST2014-07-28T00:19:11+5:302014-07-28T00:58:34+5:30
जालना/तीर्थपुरी : भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने भोकरदन पाठोपाठ घनसावंगीतही राजकीय धूसफूस सुरू झाली आहे.

घनसावंगीतही धूसफूस
जालना/तीर्थपुरी : भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने भोकरदन पाठोपाठ घनसावंगीतही राजकीय धूसफूस सुरू झाली आहे. रविवारी घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव आणि तीर्थपुरी येथील ३३ के.व्ही. केंद्राच्या कार्यक्रमातून शिवसेनेच्या जि.प. अध्यक्षा, पं.स. सभापतींसह सदस्यांनी शिवसेना लोकप्रतिनिधींना डावलण्यात येत असल्याचे सांगत निषेध करून बहिष्कार टाकला. तर ही मंडळी गेल्यानंतर पालकमंत्री राजेश टोपे यांनी तेथे येऊन कार्यक्रम उरकून घेतला.
रविवारी घनसावंगी आणि अंबड या दोन तालुक्यांमध्ये चार ठिकाणी ३३ के.व्ही. केंद्राचे उदघाटन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते. सुरूवातीला महावितरणने याबाबतचे निमंत्रण परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांना दिलेच नाही. त्यामुळे खा. जाधव यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार केली. ‘परस्पर भूमिपुजनाचा कार्यक्रम कसा आयोजित केला, परभणी लोकसभा मतदारसंघात घनसावंगी व परतूर विधानसभा मतदारसंघांचा समावेश असल्याने आपण तेथील खासदार आहोत. त्यामुळे आपले नाव कार्यक्रम पत्रिकेत का नाही’ असा जाबही खा. जाधव यांनी विचारला. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची धांदल उडाली व नंतर त्यांनी कार्यक्रम पत्रिकेत खा. जाधव यांचे नाव समाविष्ट केले. मात्र या प्रकारामुळे खा. जाधव यांनी सदरील कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
पत्रिकेत अंबड पंचायत समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापती अनिता पैठणे यांचे नाव होते. मात्र घनसावंगी पं.स. चे शिवसेना सभापती मधुकर साळवे यांचे नाव पत्रिकेत नव्हते.
बाणेगाव येथे जि.प. अध्यक्षा आशा भुतेकर यांच्यासह शिवसेना सदस्यही उपस्थित होते. परंतु ही सर्व मंडळी व्यासपीठाखालीच बसेलली होती. बराच वेळ प्रतीक्षा करूनही पालकमंत्री कार्यक्रमस्थळी न आल्याने शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी संयोजकांचा निषेध करून शिवसेनेच्या जि.प. अध्यक्षा भुतेकर, पं.स. सभापती मधुकर साळवे, उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, रवींद्र आर्दड, पं.स. सदस्य उद्धव मरकड, डॉ. राजेंद्र राऊत, प्रल्हाद वराडे, अंबादास उढाण, कुंडलिक जाधव, प्रेमसिंग राठोड, भीमा बोबडे आदींनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
शिवसेनेची मंडळी तेथून गेल्यानंतर काही वेळातच पालकमंत्री राजेश टोपे तेथे दाखल झाले. टोपे यांच्या हस्ते बाणेगाव येथील ३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी अंबड पं.स. च्या सभापती अनिता पैठणे यांचे पती रमेश पैठणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता एस.डी. शिंदे, अधीक्षक अभियंता बी.टी. पानढवळे, कार्यकारी अभियंता बी.जी. पवार यांची उपस्थिती होती. यावेळी उत्तमराव पवार, अॅड. अमरसिंह खरात, तात्यासाहेब उढाण, साळीकराम उढाण, तुषार पवार, लक्ष्मण जाधव, कल्याण सपाटे, बक्षी, शेळके, ज्ञानदेव मुळे, सुदाम मुकणे, अंकुशराव उढाण, भागवत उढाण, सर्जेराव उढाण, गोरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नाव जाणीवपूर्वक टाकले नाही - साळवे
घनसावंगी पंचायत समितीचे शिवसेना सभापती मधुकर साळवे म्हणाले, घनसावंगी तालुक्यातील कार्यक्रम असताना अंबड पं.स. सभापतींचे नाव पत्रिकेत टाकले, मात्र माझे नाव जाणीवपूर्वक टाकले नाही, असा आरोप साळवे यांनी केला.
तो अधिकार पालकमंत्र्यांचा - मुख्य अभियंता
वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता एस.डी. शिंदे म्हणाले, कार्यक्रम पत्रिकेवर नावे टाकण्याचा अधिकार पालकमंत्री यांचा आहे. त्यामुळे आमचा काहीही संबंध नाही, असे मुख्य अभियंता शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना स्पष्ट केले.
परस्पर भूमिपूजने, उद्घाटने करू नयेत - जाधव
परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव याबाबत ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले की, घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा आपल्या लोकसभा मतदारसंघात येत असल्याने येथे अधिकाऱ्यांनी परस्पर भूमिपूजन, उदघाटनाचे कार्यक्रम करू नयेत. आपणासही या कार्यक्रमांची पूर्वकल्पना दिली पाहिजे, अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशाराही खा. जाधव यांनी दिला.