नगरपालिका कर्मचाऱ्यांचा घेराव
By Admin | Updated: July 23, 2014 00:25 IST2014-07-22T23:49:12+5:302014-07-23T00:25:49+5:30
पाथरी : नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १५ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे.
नगरपालिका कर्मचाऱ्यांचा घेराव
पाथरी : नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १५ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाअंतर्गतच आज २२ जुलै रोजी आ. बाबाजानी दुर्राणी यांना नगरपालिका कर्मचाऱ्यांनी घेराव घालून निवेदन सादर केले.
नगरपालिका कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०० टक्के वेतन द्यावे, २००० सालापूर्वीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनासाठी शासनाने अनुदान द्यावे, महागाई भत्ता अनुदान वितरित करण्यात यावे, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यात यावेत, या मागण्यांसाठी नगरपालिकेचे सर्वच कर्मचारी १५ जुलैपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचारी संपावर गेल्यामुळे शहरातील स्वच्छता आणि पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. नगरपालिका कार्यालयही कर्मचाऱ्यांविना ओस पडले आहे. २१ जुलै रोजी या कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी २२ जुलै रोजी नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आ. बाबाजानी दुर्राणी यांना घेराव घालून मागण्याबाबतचे निवेदन सादर केले.
आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष बी. यू. भाले पाटील, उपाध्यक्ष जमील अन्सारी, व्ही. एस. वीरकर, एम. जी. फारोखी, आर. जी. विश्वमित्रे, एम. जी. दिवाण, बी. एम. जाधव, आर. बी. डावरे, बी. आर. चिंचणे, आर. एन. नवले यांच्यासह पालिकेतील इतर कर्मचारी सहभागी झाले होते.(वार्ताहर)
शासनस्तरावर प्रयत्न करु- दुर्राणी
नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या रास्त असून या मागण्यांसाठी आपणही या कर्मचाऱ्यांसोबत आहेत. शासनस्तरावर याबाबत पाठपुरावा सुरु असून नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्यासोबत २३ जुलै रोजी न. प. कर्मचारी पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत तोडगा निघेल, अशी प्रतिक्रिया आ.बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.