अजिंठा, चौका घाटातील रस्ते रुंदीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:12 IST2021-01-08T04:12:18+5:302021-01-08T04:12:18+5:30
सिल्लोड : औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या चौपदरीकराणाचे काम अजिंठा आणि चौका घाटात वनविभागाच्या परवानगीअभावी ...

अजिंठा, चौका घाटातील रस्ते रुंदीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
सिल्लोड : औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या चौपदरीकराणाचे काम अजिंठा आणि चौका घाटात वनविभागाच्या परवानगीअभावी रखडले होते. या रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन परवानगी देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी वनविभागासह सर्व विभागांना आदेश देऊन रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती राज्यमंत्री सत्तार यांनी दिली.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशविदेशांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. यामुळे औरंगाबाद- जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. सदरचा रस्ता अरुंद असल्यामुळे येथे अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. केंद्र सरकारने सदरच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याकरिता मंजुरी दिलेली आहे, तसेच रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी निधीचीदेखील उपलब्धता देण्यात आली आहे. सदरच्या रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले आहे. केवळ अजिंठा आणि चौका घाटातील काही भागांचे काम वनविभागाच्या परवानगीअभावी तीन महिन्यांपासून रखडलेले होते.
--------------
जिल्हा नियोजन समितीतून मिळावा निधी
जिल्हा नियोजन समितीमधून मतदारसंघाच्या विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. त्यात दलित वस्ती कार्यक्रमासाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देण्याची मागणी यावेळी केली. मतदारसंघातील विकासकामांसाठी गौणखनिज स्वामीत्व धनाच्या हिश्श्यातील जास्तीत जास्त रक्कम मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.