खराब रस्त्याचा मुख्यमंत्र्यांनाही फटका; हेलिकॉप्टरद्वारे केली महाजनादेश यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 06:43 PM2019-08-29T18:43:24+5:302019-08-29T19:03:12+5:30

औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम ठप्प  

CM suffrs from bad roads; Mahajanadesh Yatra continues with Helicopter | खराब रस्त्याचा मुख्यमंत्र्यांनाही फटका; हेलिकॉप्टरद्वारे केली महाजनादेश यात्रा

खराब रस्त्याचा मुख्यमंत्र्यांनाही फटका; हेलिकॉप्टरद्वारे केली महाजनादेश यात्रा

googlenewsNext
ठळक मुद्देपदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठीच्या मेहनतीवर पाणी

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते जळगाव हा रस्ता कंत्राटदाराने खोदून ठेवल्यामुळे तो खराब अवस्थेत आहे. त्याचा फटका बुधवारी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच बसला. महाजनादेश यात्रेचा रथ (व्हॅनिटी व्हॅन) खराब रस्त्यांमुळे फुलंब्री ते सिल्लोडपर्यंत जाणे शक्य नसल्यामुळे त्यांनी विमानतळावरून हेलिकॉप्टरने फुलंब्रीतील सभास्थान गाठले. दरम्यान पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व रथाच्या आगमनाप्रीत्यर्थ केलेल्या स्वागताच्या तयारीवर पाणी फेरले गेले. 

मुख्यमंत्र्यांची यात्रा ज्या मार्गाने जाणार होती, त्या मार्गावर जि. प. सदस्य अनुराधा चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागताची तयारी केली होती. परंतु मुख्यमंत्री त्या मार्गाने आलेच नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. औरंगाबाद ते जळगाव हा रस्ता अनेक ठिकाणी कामासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. सिल्लोडपर्यंत तो रस्ता खराबच आहे. पुलाचे काम सुरू  असल्यामुळे रस्ता उखडलेला आहे. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे काही ठिकाणी तातडीने डागडुजी करण्यात आली. परंतु मुख्यमंत्री त्या रोडने आलेच नाहीत. फुलंब्री ते सिल्लोड आणि पुढे भोकरदनमार्गे जालन्याकडे गेले.

२२ हजार प्रवाशांना दररोज खड्डेमय रस्त्यांच्या ‘यातना’
औरंगाबाद ते जळगाव चौपदरी रस्त्याचे काम रेंगाळल्याचा फटका दररोज हजारो प्रवाशांना बसत आहे. प्रवासाचा कालावधी वाढला असून, विलंबासह आदळआपटीच्या यातना प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. फुलंब्रीमार्गे या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या २७९ बसगाड्यांतून तब्बल २२ हजार नागरिक प्रवास करतात. मध्यवर्ती बसस्थानकातून एकट्या फुलंब्रीसाठी २७ बसफेऱ्या करतात. तर जळगाव, बºहाणपूरसाठी १२ बसगाड्या धावतात. याशिवाय इतर आगार, इतर विभागांच्या बसच्या संख्येंचा विचार करता दिवसभरात २७९ बसगाड्यांची ये-जा होते. एका बसमध्ये किमान ४० प्रवासी असतात. याचा विचार करता २२ हजार प्रवासी या खड्डेमय रस्त्यांवरून ये-जा करीत आहेत. औरंगाबादहून फुलंब्रीचा प्रवास साधारण ४० मिनिटांचा आहे. परंतु आजघडीला तो दीड दोन तासांवर गेला आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ‘एस. टी.’च्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. ‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस. टी.’ असे वाक्य सत्यात उतरविण्यासाठी गावागावांपर्यंत एस. टी. पोहोचविण्याचा प्रयत्न एस. टी. महामंडळाकडून केला जातो. परंतु खराब रस्त्यांमुळे प्रवाशांसह एस.टी. महामंडळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

Web Title: CM suffrs from bad roads; Mahajanadesh Yatra continues with Helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.