Lumpy Skin Disease Virus: आता जनावरांनाही क्वारंटाइन करणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश
By मुकेश चव्हाण | Updated: September 16, 2022 18:11 IST2022-09-16T17:03:29+5:302022-09-16T18:11:58+5:30
Lumpy Skin Disease Virus: देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे.

Lumpy Skin Disease Virus: आता जनावरांनाही क्वारंटाइन करणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश
- मुकेश चव्हाण
औरंगाबाद- देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. खेड्यापाड्यातील अनेक पशुपालकांचे पशुधन विशेषतः गाई आणि काही प्रमाणात म्हशी या रोगाला बळी पडताना दिसतात. देशातील १२ राज्यात जवळजवळ १६५ जिल्ह्यातील ११.२५ लाख गाई-म्हशींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. साधारणपणे ५० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे. औरंगाबादमध्ये ३२ पशुधनाला लम्पी रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या रोगाने एकाही जनावराचा मृत्यू झालेला नाही. याचपार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी आजाराबाबत मोठी घोषणा केली आहे. लम्पी आजारामुळे आता जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरु करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे आज यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी लम्पी रोगाबाबत उपययोजनेविषयी माहिती दिली. लम्पी आजारावर लस उपलब्ध केली आहे. लम्पी आजारासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ज्यांचे जनावरे मृत्युमुखी पडले त्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत राज्य सरकार करेल. तसेच लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन, जनावरांना क्वारंटाईन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
औरंगाबाद- लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन, जनावरांना क्वारंटाईन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. pic.twitter.com/0WRAa0SCX4
— Lokmat (@lokmat) September 16, 2022
सांगलीत आतापर्यंत ३८ जनावरांना लम्पीची लागण
सांगली जिल्ह्यात आतापर्यंत ३८ जनावरांना लम्पीची लागण झाल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली. बाधित ३८ जनावरापैकी २० जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत २० हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून आत्तापर्यंत एकही जनावरांचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे.
संसर्ग कळवा, अन्यथा कारवाई
या रोगाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत लेखी स्वरूपात माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माहिती लपविल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात यावेत. संसर्गित पशू मृत झाल्यास त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, नगर पंचायत, महापालिका यांच्यावर राहणार आहे. याच्या उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय रॅपिड ॲक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत.