मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही १ जूननंतर ऐकणार नाही: इम्तियाज जलील
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 15:57 IST2021-05-25T15:55:43+5:302021-05-25T15:57:01+5:30
Imtiaz Jaleel on Lockdown: राज्यात आता लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन राजकारण रंगताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही १ जूननंतर ऐकणार नाही: इम्तियाज जलील
Imtiaz Jaleel on Lockdown: राज्यात आता लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन राजकारण रंगताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. लॉकडाऊन उठला नाही, तर १ जूनपासून औरंगाबादमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांचं पालन केलं जाणार नाही. दुकानं उघडली जातील, असा थेट इशारा एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
"लॉकडाऊन शिथील करण्याची गरज आता आहे. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन मागे घेतला गेला पाहिजे नाहीतर लोकं स्वत: लॉकडाऊन आता पाळणार नाहीत. औरंगाबादची जनता तर नक्कीच १ जूनपासून लॉकडाऊनचं पालन करणार नाही. दोन महिन्यांपूर्वी शहराचा कोरोनाचा आकडा १८०० वर गेला होता, पण आज आपण १२० वर आलो आहोत. ग्रामीण भागात २०० च्या आसपास आलो आहोत. लोकांनी इतकं सहकार्य दिलं, इतकं कष्ट सहन करुन आकडेवारी कमी केली. आता पुन्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन आमच्यासमोर ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही कोणाचं ऐकणार नाही. मग पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मी सांगितलं तरी लोक १ तारखेनंतर ऐकणार नाहीत", असं इम्तियाज जलील म्हणाले.
इम्तियाज जलील दुकानं उघडायला आले तर शिवसैनिक उत्तर देतील, चंद्रकांत खैरे यांची सडकून टीका
लॉकडाऊनला पण एक मर्यादा असते. आजवर लोकांनी खूप सहन केलंय. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि दोनवेळचं जेवण मिळवण्याचे वांदे झाले आहेत. पंतप्रधानानंच तर आम्ही २०० टक्के ऐकणार नाही. आम्हीच काय आता तर त्यांचे भक्त देखील ऐकणार नाहीत. कारण जेव्हा देशात कोट्यवधी लोक रडत होते. तेव्हा पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये दीदी ओ दीदी करत होते, असा टोला देखील जलील यांनी लगावला आहे.
दरम्यान, जलील यांनी दिलेल्या आव्हानाला शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये दुकानं उघडण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना त्यांना उत्तर देईल, असा इशाराच खैरे यांनी दिला आहे. राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या निर्णयांचं पालन झालंच पाहिजे. जलील यांच्या वक्तव्या दखल घेऊन प्रशासनानं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी खैरे यांनी यावेळी केली.