दिवसभर ढग, रात्री टिप्पूर चांदणे
By Admin | Updated: August 4, 2014 00:52 IST2014-08-04T00:47:31+5:302014-08-04T00:52:55+5:30
विठ्ठल कटके, रेणापूर तालुक्यात उशिरा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. कमी-जास्त पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही

दिवसभर ढग, रात्री टिप्पूर चांदणे
विठ्ठल कटके, रेणापूर
तालुक्यात उशिरा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. कमी-जास्त पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. दुबार पेरणी झाली. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने गुंगारा दिल्याने उगवलेले सोयाबीन माना टाकू लागले आहे. पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला असल्याने तालुक्यावर दुष्काळाची छाया पसरली आहे.
तालुक्यात यावर्षी उशिरा पाऊस झाला. त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांना तब्बल पंधरा दिवस उशीर झाला. त्यात उडीद-मूग या पिकात मोठी घट झाली. त्याची जागा सोयाबीन पिकाने घेतली. तालुक्यात तब्बल तीस हजार हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा आहे. पेरणीनंतर मध्यंतरी पाऊस न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यात शेकडो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला.
२२ जुलैअखेर तालुक्यात रेणापूर विभागात १२८ मि.मी. पानगाव विभागात-१२२ मि.मी., पोहरेगाव विभागात-१७८ मि.मी. तर कारेपूर विभागात १४५ मि.मी. असा एकूण सरासरी १४३ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघाड दिल्याने उगवलेले सोयाबीन व इतर पिके पावसाअभावी माना टाकीत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण, त्यात जोराचा वारा तर रात्री टिप्पूर चांदणे पडत आहे़ त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. आठवड्यात जर मोठा पाऊस झाला, तरच पिके हाती लागतील. अन्यथा शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामोरे जावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हजारो शेतकरी आभाळाकडे टक लावून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
तालुक्यात पोहरेगाव, पळशी, शेरा, निवाडा, सिंधगाव, दर्जी बोरगाव, इंदरठाणा, सांगवी, भोकरंबा, आंदलगाव, लखमापूर, डिगोळ देशमुख आदी भागांत ऊस व इतर खरीप पिकांचे रानडुकरांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उसाची तर मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. शिवाय, हरीण व इतर वन्यप्राण्यांचाही पिकांना उपद्रव होत असल्याचे शेतकरी व्यंकटी कातळे, राम मोरे, गंगासिंह कदम, दगडू सावंत, अॅड. प्रमोद जाधव यांनी सांगितले़
गेल्या रबी हंगामात ज्वारीचे पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे कडबा उपलब्ध नाही. यामुळे हिरवा चारा नाही. त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावरही झाला आहे. हिरवा चारा नसल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी जनावरांना पेंड, सोयाबीनची गुळी हेच खाद्य देत आहेत.
पशुधनांचे हाल सुरु़़़
पावसाची सरासरी अत्यंत कमी झाल्यामुळे यावर्षी तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होतो की काय? अशी स्थिती सध्या आहे. अनेक पाझर तलावात अपुरे पाणी आहे़ रेणा धरणात काही अंशी पाणीपातळी वाढली आहे. शिवाय, हिरवा चारा जनावरांसाठी उपलब्ध नाही. नद्या-नाल्यांना पाणी नसल्याने जनावरांचे मोठे हाल होत आहेत.