आगारप्रमुखांना भेटण्यासाठी आलेल्या प्रवाशाला कोठडी!
By Admin | Updated: June 25, 2014 01:27 IST2014-06-25T01:13:41+5:302014-06-25T01:27:28+5:30
पैठण : पैठण एस.टी. आगार प्रमुखांची भेट घेण्यासाठी आलेल्या एका प्रवाशाला सुरक्षा रक्षकाने मज्जाव केला. यातून सुरक्षा रक्षक व प्रवासी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

आगारप्रमुखांना भेटण्यासाठी आलेल्या प्रवाशाला कोठडी!
पैठण : पैठण एस.टी. आगार प्रमुखांची भेट घेण्यासाठी आलेल्या एका प्रवाशाला सुरक्षा रक्षकाने मज्जाव केला. यातून सुरक्षा रक्षक व प्रवासी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सुरक्षा रक्षकाने कायद्याचा आधार घेत सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केली. एस.टी.त बसण्याऐवजी प्रवाशास रात्रभर पोलीस स्टेशनच्या कारागृहात बसावे लागले.
चनकवाडी येथील प्रवाशी आत्माराम सोनाजी भोसले यास आगारप्रमुख वावरे यांना भेटण्याची इच्छा झाली. आगाराच्या प्रवेशद्वारावर त्याची डेपोचे सुरक्षा रक्षक दत्तात्रय बप्पासाहेब पाचे यांच्याशी गाठ पडली. आगारप्रमुखांना भेटायचे आहे, असे आत्मारामने सांगितले. आगारप्रमुख आगारात नाहीत असे सुरक्षा रक्षक पाचेंनी आत्मारामला सांगितले; परंतु मी आगार प्रमुखांना आगारात जाताना पाहिले तू कसा खोटे बोलतो, असे आत्मारामने पाचे यांना सुनावले. यातून दोघांत चांगलीच जुंपली. प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेले. प्रकरण एवढे गंभीर नाही आपणास मिटवून घ्या कशाला गुन्हा दाखल करता, असा तंटामुक्तीचा सल्ला पोलिसांनी एस.टी. अधिकाऱ्यांना दिला; मात्र तो त्यांनी ऐकला नाही. गुन्हा दाखल झालाच.
आम आदमीचा आवाज दबेल
या प्रकरणात चूक प्रवाशाची की डेपो सुरक्षा रक्षकाची हे पोलीस तपासात किंवा न्यायालयात सिद्ध होईल; परंतु कायद्याचा धाक दाखवून अनेक कार्यालयात आम आदमीचा आवाज दाबला जात आहे. यामुळे अन्याय बरा; परंतु न्यायासाठी दाद मागणे नको, असे म्हणत सरकारी बाबूंशी पंगा नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.