औरंगाबादच्या घाटीतील दोन्ही सीटी स्कॅन यंत्रे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:28 IST2018-09-09T00:28:27+5:302018-09-09T00:28:54+5:30
गोरगरिबांची जीवनवाहिनी असलेल्या घाटी रुग्णालयातील दोन्ही सीटी स्कॅन यंत्रे नादुरुस्त झाली आहेत. परिणामी, दररोज जवळपास १२० गोरगरीब रुग्णांवर बाहेरून सीटी स्कॅन करण्याची वेळ येत आहे. त्यातून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

औरंगाबादच्या घाटीतील दोन्ही सीटी स्कॅन यंत्रे बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गोरगरिबांची जीवनवाहिनी असलेल्या घाटी रुग्णालयातील दोन्ही सीटी स्कॅन यंत्रे नादुरुस्त झाली आहेत. परिणामी, दररोज जवळपास १२० गोरगरीब रुग्णांवर बाहेरून सीटी स्कॅन करण्याची वेळ येत आहे. त्यातून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
घाटीत ६४ स्लाईड आणि ६ स्लाईड, अशी दोन सीटी स्कॅन यंत्रे आहेत. ६ स्लाईड सीटी स्कॅन सहा दिवसांपासून, तर ट्यूब खराब झाल्याने ६४ स्लाईड सीटी स्कॅन यंत्र शुक्रवारपासून बंद पडले आहे. या दोन्ही यंत्रांद्वारे दररोज १२० रुग्णांचे सीटी स्कॅन होते. यातील ६ स्लाईड सीटी स्कॅन यंत्र फेब्रुवारीत नादुरु स्त झाले होते. घाटीतील यंत्रांना दुर्लक्षामुळे नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी वेळीच निधी मिळत नाही, तर अनेक यंत्रे जुनाट झाल्याने यंत्रांमध्ये वारंवार बिघाड होत आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे म्हणाले की, सध्या दोन्ही यंत्रे बंद आहेत; परंतु सोमवारपर्यंत सीटी स्कॅनची सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
कराराची शक्यता
निधीच्या अडचणीमुळे दोन्ही यंत्रे लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे घाटीतील रुग्णांच्या सीटी स्कॅनसाठी खाजगी कें द्राबरोबर सामंजस्य करार करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.