स्वच्छता विशेषांक धूळ खात; सर्व शिक्षा अभियानात नियोजनाचाच ‘कचरा’
By Admin | Updated: February 6, 2015 00:57 IST2015-02-06T00:39:57+5:302015-02-06T00:57:15+5:30
बीड : दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्वच्छतेचा डंका पिटत असताना येथील सर्व शिक्षा अभियानातील अधिकाऱ्यांना मात्र त्याचे काही देणे-घेणे राहीले नाही की काय?

स्वच्छता विशेषांक धूळ खात; सर्व शिक्षा अभियानात नियोजनाचाच ‘कचरा’
बीड : दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्वच्छतेचा डंका पिटत असताना येथील सर्व शिक्षा अभियानातील अधिकाऱ्यांना मात्र त्याचे काही देणे-घेणे राहीले नाही की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण डिसेंबर २०१४ मध्ये शाळांसाठी स्वच्छता विशेषांक आले होते, ते फेब्रु्रवारी उजाडला तरी जिल्हा कार्यालयातच धूळ खात पडून आहेत. सफाई तर दूरच; पण विशेषांकालाच अडगळीत टाकून अधिकाऱ्यांनी नियोजनाचा ‘कचरा’ केल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पुढे आला.
पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने ‘जीवन शिक्षण’ हे मासिक प्रकाशित केले जाते. तब्बल ५९ वर्षांची परंपरा असलेले हे मासिक राज्यातील बहुतांश जि.प. शाळांमध्ये जाते. शिक्षण क्षेत्राशी निगडीत मजकूर या विशेषांकातून दिला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी स्वच्छता मोहीम गतिमान केली. २५ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर २०१४ या दरम्यान ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ ही विशेष मोहीम घेण्यात आली होती. त्यानुषंगाने डिसेंबर महिन्यात जीवन शिक्षणने स्वच्छता विशेषांक काढला होता. शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांच्यासह इतर वरिष्ठ व तज्ज्ञांचे त्यात लेख व समर्पक छायाचित्रे आहेत. २ हजार ४४७ शाळांमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत व ३ हजार २७८ शाळांमधील स्वच्छतागृहे वापरात नाहीत. स्वच्छतागृहांची उपयोगिता व महत्त्व वाढावे, असा उद्देश या मासिकाचा उद्देश होता. शिवाय विद्यार्थ्यांत स्वच्छतेचे महत्त्व वाढावे हा देखील हेतू होता.
मासिकांच्या दोन हजारांवर प्रती बीडच्या सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यालयात डिसेंबर महिन्यात दाखल झाल्या. त्यापैकी निम्म्याच प्रती शाळांमध्ये पोहोचल्या. उर्वरित विशेषांक कार्यालयातच अडगळीला पडलेले आहेत. त्यावर धूळ साचली असून किती पोहोच झाले? किती राहिले? याचा हिशेबही कार्यालयात नाही. विशेषांकावरच धूळ साचल्याने स्वच्छतेची किती ‘काळजी’ आहे? हे देखील यानिमित्ताने समोर आले आहे. (प्रतिनिधी)
सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, स्वच्छता विशेषांक शाळांपर्यंत पोहोचवले आहेत. काही राहिले असतील तर ते का वाटप झाले नाही? याची चौकशी करावी लागेल.