ख्रिसमसच्या स्वागतासाठी शहर उजळले
By Admin | Updated: December 25, 2014 00:47 IST2014-12-25T00:36:59+5:302014-12-25T00:47:08+5:30
औरंगाबाद : अवघ्या विश्वाला प्रेम आणि शांतीचा संदेश देणारे प्रभू येशू ख्रिस्त ज्या दिवशी पृथ्वीवर अवतरले तो २५ डिसेंबरचा दिवस जगभर ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो.

ख्रिसमसच्या स्वागतासाठी शहर उजळले
औरंगाबाद : अवघ्या विश्वाला प्रेम आणि शांतीचा संदेश देणारे प्रभू येशू ख्रिस्त ज्या दिवशी पृथ्वीवर अवतरले तो २५ डिसेंबरचा दिवस जगभर ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. प्रभूच्या जन्मदिनासह नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील चर्च रोषणाईने उजळून निघाले आहेत.
नव्या इच्छा, आकांक्षा घेऊन नव्या वर्षाला सामोरे जाण्यासाठीचा दिवस म्हणजे ख्रिसमस अर्थात नाताळ. या सणाचे वेध तसे डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच लागत असल्याचे ख्रिस्ती बांधवांनी सांगितले. शहरातील शंभराहून अधिक चर्च सध्या रोषणाई, मेणबत्त्या, झिरमिळ्यांनी प्रकाशात न्हाऊन निघाले आहेत. यात छावणी भागातील ख्राइस्ट चर्च, नगर नाक्याजवळील ट्रिनिटी चर्च व सेंट इव्हेंज्युअलिस चर्च सर्वाधिक जुने आहेत. प्रभू येशू व माता मेरीच्या प्रतिमांनाही सजविण्यात आले आहे. भेटवस्तू, रिबिन्स आणि रोषणाईने सजविलेले ख्रिसमस ट्री लक्ष वेधून घेत होते. शहरभर लाल पोशाख आणि पांढरीशुभ्र दाढी घेऊन फिरणारे सांताक्लॉज चिमुकल्यांना भेटवस्तूंची उत्सुकता लावत होते. गेले पंधरा दिवस कैरोल सिंगिंगने सुरू झालेली ही तयारी व त्याचा उत्साह गुरुवारी मध्यरात्रीही कायम असणार आहे. आज रात्री १०.३० वाजता कैरोल सिंगिंग आणि सामुदायिक प्रार्थना झाली. त्यानंतर ११ वाजता पवित्र मिसा झाला. यात प्रस्तावना, आरती, विनंत्या, अर्पणाचे दान, प्रार्थना झाली. त्यानंतर बांधवांनी केकचा आनंद घेतला.
अनेक चर्चमध्ये महिलांसाठी नाताळच्या रेखाटनांवर रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. प्रभू येशूचा जन्म गोठ्यात झाला, असे मानण्यात येते. यानुसार गव्हाण बनविण्याच्या स्पर्धाही आज उत्साहात पार पडल्या. सेंट फ्रान्सिस चर्चचे फादर लेस्ली रॉड्रिग्ज म्हणाले की, परस्परांमधील मतभेद विसरून एकत्र यावे, पवित्र प्रार्थना व विधींमधून मनाला पवित्र करावे हा ख्रिसमसचा खरा उद्देश आहे. प्रभू येशू वाईटाचा नाश करण्यासाठी अवतार घेत असतो. आपण सद्वर्तन आणि चांगल्या मनाने त्याच्या स्वागताला सज्ज असावे, हा प्रयत्न प्रत्येक जण करतो.