वैजापूर शहरात चक्क देशी दारूच्या दुकानासमोर नवीन बसथांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:01 IST2018-02-07T00:01:01+5:302018-02-07T00:01:11+5:30
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकानंतर सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून लक्ष्मी टॉकीजजवळील चौफुलीची ओळख आहे. औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांना मध्यवर्ती ठरणारा हा चौक प्रवाशांसाठी आता असुरक्षित बनला आहे.

वैजापूर शहरात चक्क देशी दारूच्या दुकानासमोर नवीन बसथांबा
मोबीन खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकानंतर सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून लक्ष्मी टॉकीजजवळील चौफुलीची ओळख आहे.
औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांना मध्यवर्ती ठरणारा हा चौक प्रवाशांसाठी आता असुरक्षित बनला आहे. कारण एसटी महामंडळाने सहा महिन्यांपूर्वी चौफुलीवरील बस थांबा बंद करुन चक्क देशी दारुच्या दुकानासमोरच हा नवीन बस थांबा बनविल्याने तिकडे दारुड्यांची नेहमीच जत्रा भरलेली असते.
त्यामुळे विद्यार्थिनी व महिलांना या बस थांब्यावर असुरक्षित वाटत असून अनेक वेळा वैजापुरकरांनी एस.टी. महामंडळाकडे तक्रार केली, तरीही हा बस थांबा हलविण्यात आलेला नाही, हे विशेष.
लक्ष्मी टॉकीजजवळ असलेला परिवहन महामंडळाचा बस थांबा सहा महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी बंद पाडला. मात्र, महामंडळाच्या अधिकाºयांनी बस थांबा सुरक्षितस्थळी हलविण्याऐवजी चक्क लक्ष्मी टॉकीजपासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या स्टेशन रस्त्यावरील देशी दारुच्या दुकानासमोर हा नवीन बस थांबा सुरु केल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, महाविद्यालयीन तरुणींना त्रास वाढला आहे. या ठिकाणी महिलांसोबत छेडछाड झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दुपारी वा सायंकाळी येथे दारुड्यांची सतत रेलचेल असते.
अशा असुरक्षित ठिकाणाहून प्रवास करण्यास प्रवाशांची तयारी नसते. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी येथील थांबे टाळत असल्याचे सांगितले जाते. त्याचा फटका बसच्या प्रवासीसंख्येवर होत आहे. तरीही वैजापूर आगार त्याविषयी फार सकारात्मक दृष्टिकोन अवलंबत नसल्याचा आरोप केला जात आहे.
च्एसटीतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. खासगी स्पर्धेला तोंड देत असताना एसटीचा प्रवासी दूर जाऊ नये यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना केल्या जातात. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता वैजापूर आगाराची नसल्याचे समोर येत आहे.
च्प्रवाशांच्या तक्रारीनंतर त्याची अंमलबजावणी काही दिवस केली जाते, त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ असे चित्र पाहायला मिळत आहे.
या महामार्गावर राज्य परिवहन महामंडळासाठी उत्पन्नाच्या दृष्टीने हा थांबा मोठा फायदेशीर आहे. दररोज या थांब्यावरून शेकडो प्रवाशांची ये-जा सुरू असते. ग्रामीण भागात आजही ‘वाट पाहीन पण एस.टी.नेच जाईन’ अशी प्रवाशांची मानसिकता आहे. तरीही बस चालक- वाहकांच्या उद्दामपणामुळे बस थांबत नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. याच थांब्यावरून करुणा निकेतन, सेंट मोनिका इंग्लिश स्कूल, हल्के दवानायक उर्दू शाळेचे शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी जातात. मात्र दोन-दोन तास थांबूनही बस थांबत नसल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.