फसलेला प्रयोग शहरात
By Admin | Updated: June 26, 2014 01:00 IST2014-06-26T00:57:29+5:302014-06-26T01:00:32+5:30
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने पथदिव्यांचे कंत्राट बीओटीवर बसविण्यासाठी चेन्नईतील एका कंपनीशी संपर्क सुरू केल्याचे वृत्त हाती आले आहे.

फसलेला प्रयोग शहरात
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने पथदिव्यांचे कंत्राट बीओटीवर बसविण्यासाठी चेन्नईतील एका कंपनीशी संपर्क सुरू केल्याचे वृत्त हाती आले आहे. ७० ते ८० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी आणि एलईडी बल्ब बसविण्याचे काम केले जाईल. एलईडीमध्ये वीज वाचेल आणि बल्बचा चांगला प्रकाश मिळेल, असा दावा पालिकेकडून केला जात आहे.
पिंपरी- चिंचवड मनपात एलईडीचा प्रयोग फसला आहे. तेथे फसलेला प्रयोग औरंगाबाद मनपा का करीत आहे, असा प्रश्न आहे. वीनवॉक या नाशिक येथील कंत्राटदार कंपनीचा बीओटीवरील करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे पालिकेने नवीन कंत्राटदाराचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये टेंडर निघणार असे पालिकेने ठरविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कोरियन तंत्रज्ञानाने बनविलेल्या बल्बची चाचणी सध्या सुरू असून आयुक्त डॉ. कांबळे यांचे निवासस्थान, सिद्धार्थ, नेहरू बालोद्यान आणि जालना रोडवरील पथदिव्यांवर ते बल्ब बसविण्यात आले आहेत.
उपअभियंत्यांना पदोन्नती
विद्युत विभागातील उपअभियंता पी.आर. बनसोडे यांना सेवानिवृत्तीसाठी अंदाजे १ वर्ष बाकी आहे. तत्पूर्वी, त्यांना कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती देण्याच्या हालचाली सुरू आहेत. एलईडी प्रकल्पासाठीच त्यांना पदोन्नती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
जुना वीज बचतीचा रेकॉर्ड नाही
वीनवॉक या संस्थेने एनर्जी सेव्हिंग फिटिंग दिली होती. त्यातून किती वीज वाचली, याचा रेकॉर्ड पालिकेच्या विद्युत विभागाकडे नाही. या प्रकरणी उपअभियंता पी.आर. बनसोडे यांना विचारले असता ते म्हणाले, त्याचे कॅल्क्युलेशन करावे लागेल.
सहा कंपन्यांनी केला संपर्क
आजवर ६ कंपन्यांनी पथदिवे बसवून देण्याबाबत पालिकेशी संपर्क केला. त्या सर्व कंपन्यांनी बल्ब बसवून देणार असल्याचे सांगितले.
इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात त्या कंपन्यांनी रस दाखविला नाही. पालिकेला इन्फ्रास्ट्रक्चर आणि बल्ब बसवून देणारी कंपनी हवी आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये काय झाले
पिंपरी- चिंचवड मनपाने एलईडी फिटिंगचा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी राबविला. ४ बाय २४ असा तो प्रकल्प होता. त्यामध्ये वीज बचत होणार असल्याचा दावा करण्यात आला होता.
२५० ते २८० वॅटपर्यंच वीज त्या पथदिव्यांना लागली. पथदिवेनिहाय १५० ते १६० वॅटपर्यंत वीज लागल्याचे दाखविले गेले. त्यामध्ये पालिकेचे नुकसान होत असल्याचे समोर आले. त्यामुळे मनपाने एचपीएसव्हीची फिटिंग करण्याचा निर्णय घेतला.