शहरात वर्षभरात होईल लिव्हर प्रत्यारोपण कें द्र
By Admin | Updated: January 17, 2016 23:54 IST2016-01-17T23:51:33+5:302016-01-17T23:54:18+5:30
औरंगाबाद : शहरात आजघडीला लिव्हर (यकृत) प्रत्यारोपणाची व्यवस्था नाही.

शहरात वर्षभरात होईल लिव्हर प्रत्यारोपण कें द्र
औरंगाबाद : शहरात आजघडीला लिव्हर (यकृत) प्रत्यारोपणाची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीमुळेच दोन दिवसांपूर्वी अवयव दानातून उपलब्ध झालेले लिव्हर मुंबईत नेऊन प्रत्यारोपण करावे लागले; परंतु आगामी वर्षभरात शहरात लिव्हर प्रत्यारोपण केंद्र सुरू होणार आहे. त्यासाठी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. सर्वसामान्यांना कमीत कमी पैशांमध्ये लिव्हर प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी एमजीएम रुग्णालयात हे युनिट स्थापन करण्यात येत असल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेस डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. सुधीर कुलकर्णी, ग्लोबल हॉस्पिटलचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. रवी मोहंका, लिव्हर सर्जन डॉ. गौरव चौबळ, डॉ. वैशाली सोलाव, डॉ. आनंद निकाळजे यांची उपस्थिती होती. डॉ. मोहंका यांनी सांगितले की, १० टक्के मृत्यू हे ब्रेन डेड असतात; परंतु अवयव दानाचे प्रमाण कमी आहे. ३०० पैकी केवळ ५० लिव्हर प्रत्यारोपण हे ब्रेन डेड रुग्णाच्या अवयव दानामुळे होते, तर उर्वरित अवयव दान हे नात्यातील दात्यांकडून होते. याविषयी जनजागृतीची गरज आहे. लोकांना माहितीच नसल्यामुळे अवयव दानाचे प्रमाण कमी असल्याचे डॉ. रवी मोहंका म्हणाले.
नातेवाईकांकडून होणाऱ्या अवयव दानात रुग्ण आणि नातेवाईक यांच्या लिव्हरची, त्यांच्या आरोग्याची जाणीव डॉक्टरांना असते; परंतु ‘ब्रेन डेड’ रुग्णाचे अवयव घेताना अधिक माहिती नसते. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण हे त्यावेळी आव्हान असते, असे डॉ. मोहंका म्हणाले. ब्रेन डेड रुग्णांच्या अवयव दानातून केल्या जाणाऱ्या प्रत्यारोपणासाठी ‘झोनल ट्रान्सप्लांट को-आॅर्डिनेशन कमिटी’ कार्यान्वित होण्यासाठी मराठवाडा हॉस्पिटल असोशिएशन प्रयत्न करणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.