जालना शहरात काँग्रेसची उद्या दुष्काळ परिषद
By Admin | Updated: August 23, 2015 23:44 IST2015-08-23T23:30:27+5:302015-08-23T23:44:45+5:30
जालना : यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असून, त्यातही जालन्यातील स्थिती गंभीर आहे. मात्र, राज्य सरकाराचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करून

जालना शहरात काँग्रेसची उद्या दुष्काळ परिषद
जालना : यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असून, त्यातही जालन्यातील स्थिती गंभीर आहे. मात्र, राज्य सरकाराचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करून दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे मंगळवारी जालना दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ४ वाजता जालन्यात दुष्काळ परिषद होणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी रविवारी पत्र परिषदेत दिली.
डोंंगरे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा दुष्काळी दौरा मंठ्यापासून सुरू होणार आहे. परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे ते सांत्वन करणार आहेत. सुरेश जेथलिया यांची व स्व. बाबसाहेब आकात यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. जालना तालुक्यातील रामनगर येथील पीकस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर बोरखेडी येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत. सायंकाळी ४ वाजता जालन्यातील मातोश्री मंगलकार्यालयात दुष्काळी परिषद घेण्यात येणार आहे. यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया यांची प्रमुख उपस्थिती राहील. परिषदेनंतर विविध मागण्यांचे काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे डोंगरे यावेळी म्हणाले.
माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बिहार राज्यासाठी तब्बल सव्वा लाख कोटींची मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्र आणि त्यातही मराठवाड्यात भीषण दुष्काळी स्थिती असताना याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप गोरंट्याल यांनी केला. गेल्या नऊ महिन्यांत फडणवीस सरकारने शेतकरी हिताचा कुठलाही ठोस कार्यक्रम राबविलेला नाही. या सरकारला शेतकऱ्यांचे दुख; दिसत नसून ते केवळ शहरी जनतेसाठीच असल्याची टीका करून विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे लोण आता मराठवाड्यातही पोहोचल्याचे ते म्हणाले. आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यातील शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई दिली, तर सध्याचे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे गोरंट्याल म्हणाले. पत्र परिषदेस राम सावंत, नगरसेवक महावीर ढक्का, विनोद यादव, विजय चौधरी, जगदीश भरतीया उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)