शहराला टंचाईच्या झळा
By Admin | Updated: July 5, 2014 00:35 IST2014-07-04T23:38:00+5:302014-07-05T00:35:50+5:30
परभणी : राहाटी बंधारा आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील प्रत्येकी दोन विद्युत मोटारी पंधरा दिवसांपासून नादुरुस्त असल्याने शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
शहराला टंचाईच्या झळा
परभणी : राहाटी बंधारा आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील प्रत्येकी दोन विद्युत मोटारी पंधरा दिवसांपासून नादुरुस्त असल्याने शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
परभणी शहराला राहाटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. या बंधाऱ्यावर चार विद्युत मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करुन हे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातून परभणी शहरापर्यंत पोहोचते. पंधरा दिवसांपासून राहाटी बंधाऱ्यावरील दोन विद्युत मोटारी नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे दोन मोटारीतूनच पाणी उपसण्याचे काम चालते. दोनच मोटारींद्वारे पाणी उपसल्या जात असल्याने परभणी शहरातील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे. त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्रावरील दोन विद्युत मोटारीदेखील बंद आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यात मोठा व्यत्यय येतो. सध्या नळांना दहा दिवसांतून एक वेळ पाणी येत आहे. शहरात पाणी सोडल्यानंतरही ते किती वेळ सोडावे, कोणत्या भागात सोडावे, याचे नियोजन नाही. त्यामुळे ठराविक भागातच दोन-दोन वेळा पाणी येते. त्याचप्रमाणे एकदा पाणी सोडल्यास ते बराच वेळ बंद केले जात नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होतो. आणखी एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा बंधाऱ्यात आहे. परंतु केवळ नियोजनाअभावी नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महानगरपालिकेने विद्युत मोटारींची तत्काळ दुरूस्ती करुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
पाण्याच्या टाकीवर कॅमेरे बसवा
शहरात विद्यानगर येथे २, खंडोबा बाजार, खाजा कॉलनी, युसूफ कॉलनी, ममता कॉलनी, एम.आय.डी.सी., राजगोपालाचारी उद्यान या ठिकाणी प्रत्येकी एक अशा सात पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांवरुन नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु काही भागात डबल पाणीपुरवठा होतो तर काही भाग वंचित राहतो. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी होत आहे.
मनपाचे आवाहन
शहरातील अनेक भागात नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी आल्यानंतर नळाद्वारेदेखील पाण्याचा अपव्यय होतो. नागरिकांनी नळांना तोट्या बसवून घ्याव्यात व पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
वाहिनीला अनेक भागात गळती
परभणी शहरात अंथरलेली जलवाहिनी ३० वर्षांपूर्वीची जुनी आहे. त्यामुळे जलवाहिनी जागोजागी फुटलेली आहे. या लिकेजेसमधून बरेच पाणी वाया जाते. महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी लिकेज काढण्याचे काम हाती घेतले. रस्त्यांचे डांबरीकरण होत असताना ६० ते ७० टक्के लिकेजेस् काढण्यात आले आहेत. परंतु अजूनही अनेक भागात जलवाहिनी फुटलेली असून, ती दुरुस्त केल्यास पाण्याची बचत होऊ शकते.