शहरातील एटीएम ‘रामभरोसे’
By Admin | Updated: February 4, 2015 00:39 IST2015-02-04T00:31:22+5:302015-02-04T00:39:57+5:30
संजय कुलकर्णी / गजेंद्र देशमुख, जालना विविध बँक ग्राहकांच्या सोयीसाठी असलेले एटीएम सुरक्षेअभावी आता चोरट्यांच्याही सोयीचे होऊ लागल्याचे चित्र सोमवारी मध्यरात्रीनंतर ‘लोकमत’ टीमने

शहरातील एटीएम ‘रामभरोसे’
संजय कुलकर्णी /
गजेंद्र देशमुख, जालना
विविध बँक ग्राहकांच्या सोयीसाठी असलेले एटीएम सुरक्षेअभावी आता चोरट्यांच्याही सोयीचे होऊ लागल्याचे चित्र सोमवारी मध्यरात्रीनंतर ‘लोकमत’ टीमने केलेल्या स्टींग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे. शहरातील एटीएम फोडल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ४० पैकी २५ एटीएम केंद्रांना भेट दिल्यानंतर यापैकी २० केंद्रे असुरक्षित असल्याचे आढळून आले.
रात्री १२.१७ वाजता रेल्वेस्थानक मार्गावरील गांधीचमन येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक नव्हता. केंद्रासमोर अंधार होता. या केंद्रापासून शंभर फुटावर असलेल्या कॅनरा बँक व युनियन बँकेच्या केंद्रावरही रक्षक दिसून आला नाही. युनियन बँकेचे केंद्राच्या परिसरात पूर्णपणे अंधार होता. याच परिसरातील १२.२५ वाजता स्टेट बँक आॅफ इंडियाच्या केंद्रावरही सुरक्षा नव्हती. या समोरील एचडीएफसीचे केंद्र बंद होते. जुन्या नगरपालिकेसमोरून मस्तगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ग्रामीण बँकेच्या केंद्रातही रक्षकाचा पत्ता नव्हता. १२.३० वाजता महावीर चौकातील स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या केंद्रावरही रक्षक नव्हता. मात्र याच रांगेतील आयसीआयसीआयच्या केंद्रावर रक्षक निद्रावस्थेत दिसून आला. परंतु आवाज ऐकल्यानंतर या रक्षकाने ‘आपण कोण, काय काम आहे’ अशी विचारणा केली. याच भागातील बँक आॅफ महाराष्ट्रच्या केंद्रावर रक्षक गाढ निद्रावस्थेत असल्याचे आढळून आले.
१२.३७ वाजता शिवाजीपुतळा भागात सेन्ट्रल बँक त्यापाठोपाठ अॅक्सिस बँकेच्या केंद्रात सुरक्षा रक्षक आढळून आला नाही. स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या केंद्रावरही रक्षक दिसला नाही. या रस्त्यावरही अंधार होता. मूर्गीवेसकडे जाणाऱ्या रस्त्यावर एचडीएफसी बँकेच्या व एटीएमच्या समोर दोन सुरक्षारक्षक होते. आमच्या केंद्रावर दररोज सुरक्षा असते, असे त्यांनी सांगितले. १२.५५ वाजता काद्राबाद भागात आयडीबीआयच्या केंद्रावरही सुरक्षा रक्षक आढळून आला नाही. देऊळगावराजा रोडवरील याच बँकेच्या केंद्रात मात्र रक्षक होता. १ वाजता बसस्थानक मार्गावरील बँक आॅफ इंडियाच्या केंद्रावरही रक्षक नव्हता. लक्कडकोट चौकासमोरील भागात अॅक्सिस बँकेचे केंद्रही रक्षकाविनाच होते. १.०५ वाजता भोकरदन नाक्यावरील स्टेट बँक हैद्राबाद त्यासमोर एचडीएफसी, त्यालगत आयडीबीआय या तिन्ही केंद्रांवरही सुरक्षेचा अभाव होता. काही अंतरावरील एसव्हीसी व कॅनरा बँकेच्या केंद्रावर सुरक्षारक्षक होता.
जालना शहरात नवीन व जुना जालना भागात मिळून विविध बँकांचे एटीएम ४० मशीन्स आहेत. मात्र बोटावर मोजण्या इतक्याच एटीएमवर सुरक्षा रक्षक होते. बहुतांश बँकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर विश्वास ठेवल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे वर्दळ नसलेल्या रस्त्यांवर तसेच काही संवेदशील भागातही सुरक्षा रक्षक नाहीत. मोजके एटीएम सोडले तरी बहुतांश ठिकाणी आतील बाजूने सीसीटीव्ही आहेत. काही ठिकाणी मशीनच्या दरवावाज्यांचीही मोडतोड झाल्याचे स्पष्ट झाले. एटीएमवर सुरक्षा रक्षकच नसल्याचे संधी साधत चोरटे मोठा डाव साधण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी.एस. कुतवाल यांना एटीएम केंद्रांच्या असुरक्षिततेविषयी विचारणा केली असता ते म्हणाले, शहरात सुमारे ४० एटीएम केंद्रे आहेत. विविध बँकांनी ठराविक एजन्सींकडे या केंद्राचे काम दिलेले आहे. त्यामुळे संबंधित एजन्सींनी या केंद्रांवर सुरक्षारक्षकांची नेमणूक केली पाहिजे. याविषयी आपण संबंधित बँकांना तातडीने सूचना देऊ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच या सुरक्षेच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करू, असेही कुतवाल म्हणाले.