नागरिकांनी आरोग्यासाठी चांगल्या सवयी लावून घ्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:41+5:302021-02-06T04:07:41+5:30
औरंगाबाद : शहरातील उच्च दर्जाचे सिमेंट रस्ते आणि मोठ्या इमारती तसेच रस्त्यावरून धावणाऱ्या महागड्या गाड्या म्हणजे आदर्श शहर नाही ...

नागरिकांनी आरोग्यासाठी चांगल्या सवयी लावून घ्याव्यात
औरंगाबाद : शहरातील उच्च दर्जाचे सिमेंट रस्ते आणि मोठ्या इमारती तसेच रस्त्यावरून धावणाऱ्या महागड्या गाड्या म्हणजे आदर्श शहर नाही तर नागरिकांच्या जीवन शैलीवरून शहराचा दर्जा ठरत असतो. पर्यावरण पूरक व आरोग्याच्या चांगल्या सवयी जाणीपूर्वक लावून घेणे गरजेचे आहे. गेट गोईंग सारखी संस्था दहा वर्षापासून काम करत असून, शहरातील प्रत्येक नागरिकाने असेच काम करावे , असे प्रतिपादन महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी केले.
गेट गोईंग संस्थेने मराठवाड्यात प्रथमच आयोजित केलेल्या डूएथलाॅन या अभिनव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. अतुल सावे, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, सायकलिस्ट फाउंडेशनचे डॉ. विजय व्यवहारे, मिसेस फूड राईचे संदीप सिंग, परलीन सिंग, मनपा वाॅर्ड अधिकारी मीरा चव्हाण आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेला शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली. देशातील हजारो स्पर्धकांनी डूएथलाॅन स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. सात फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ५० स्पर्धकांनाच उद्घाटन कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले होते. वसंतराव नाईक चौकात स्पर्धक एकत्र आले होते. धावण्याच्या स्पर्धेत पाच आणि दहा किलोमीटर, सायकलिंगमध्ये दहा आणि वीस किलोमीटर, अशी स्पर्धा होत आहे.
गेट गोईंगच्या वतीने सुशोभिकरण करण्यासाठी सिडको उड्डाणपुलाखालील जागा महापालिकेने दिल्याबद्दल गेट गोईंग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त तथा आस्तिक कुमार पाण्डेय यांचे आभार मानले.