जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव
By Admin | Updated: June 8, 2014 00:55 IST2014-06-08T00:29:53+5:302014-06-08T00:55:57+5:30
उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयातील असुविधांबाबत तक्रारी वाढत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी रूग्णालयात जावून असुविधांचा पंचनामा केला.

जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव
उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयातील असुविधांबाबत तक्रारी वाढत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी रूग्णालयात जावून असुविधांचा पंचनामा केला. यानंतर त्यांनी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव घालून रूग्ण व नातेवाईकांना तातडीने सर्व सुविधा पुरविण्याची मागणी केली.
जिल्हा रूग्णालयात डॉक्टर्स वेळेवर उपलब्ध न होणे, सोनोग्राफीसाठी विलंब यासारख्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित देवकते यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी रूग्णालयात जाऊन तेथील सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांना रूग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे दिसून आले. यामुळे तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या, असे देवकते यांनी सांगितले. यानंतर पदाधिकाऱ्यांनी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बचाटे यांची भेट घेऊन रूग्णालयातील गैरसोयींचा पाढा वाचला. यावेळी सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणीही डॉ. बचाटे यांच्याकडे करण्यात आले. या आंदोलनात दादा कांबळे, राहुल बचाटे, प्रदीप सूर्यवंशी, संदीप जाधव, सोमना सर्जे, गिरीश पानसरे, बंटी घाटे, युगंधर धोंगडे, व्यंकट जाधव, अजय सपकाळ, शाहीद शेख, अनिल गायकवाड, विशाल माळी, दीपक सुरवसे आदी सहभागी झाले होते. गैरसोई दूर नाही झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही या पदाधिकाऱ्यांनी दिला. (प्रतिनिधी)