सिडको ते बीड बायपास येणार हाकेच्या अंतरावर
By Admin | Updated: July 20, 2016 00:28 IST2016-07-20T00:06:17+5:302016-07-20T00:28:53+5:30
औरंगाबाद : हर्सूल, सिडको परिसर आणि वसंतराव नाईक चौक ते बीड बायपास रोड आगामी काळात हाकेच्या अंतरावर येणार आहेत.

सिडको ते बीड बायपास येणार हाकेच्या अंतरावर
औरंगाबाद : हर्सूल, सिडको परिसर आणि वसंतराव नाईक चौक ते बीड बायपास रोड आगामी काळात हाकेच्या अंतरावर येणार आहेत. सिडको उड्डाणपूल ते जयभवानीनगर ते बीड बायपास हे अडीच किलोमीटर अंतर काही मिनिटांत पार करता येणे शक्य होणार आहे ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित रेल्वे ओव्हरब्रीज आणि त्यापुढे बायपासपर्यंत होणाऱ्या ३० मीटर रुंद रस्त्यामुळे. यासाठी जयभवानीनगरमध्ये नव्याने कोणत्या मालमत्तेची पाडापाडी करावी लागणार नाही. असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. रोड रुंदीकरणासाठी पुन्हा पाडापाडी करावी लागणार या भीतीमुळे जयभवानीनगर व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते जयभवानीनगरच्या १२ नं.गल्लीपर्यंत उड्डाणपुलाचा प्रस्ताव आहे. शिवाजी महाराज चौक ते रेल्वेस्टेशनपर्यंतचा रोड गेल्या वर्षी रुंद करण्यात आला असून, त्यासाठी बहुतांश मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. २४ मीटरपर्यंत तो रोड रुंद करण्यात आला आहे.
तो रोड काँक्रिटीकरणातून सहापदरी करण्याचा प्रस्ताव सध्या आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडे त्या रस्त्याचे काम देण्यात आले होते. परंतु महामंडळाकडे निधी नसल्यामुळे बीड बायपास आणि जयभवानीनगर रोड काँक्रिटीकरण व रेल्वे ओव्हरब्रीजचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहे.
सोलापूर ते औरंगाबाद ते धुळे हायवे विकास योजनेंतर्गत या रोडचे काम करण्यात येणार आहे. हा रोड भविष्यात टुरिझम रोड म्हणून पुढे येणार आहे.
बीड बायपासपासून ते सिडको उड्डाणपूल ते हर्सूलमार्गे अजिंठा लेण्यांकडे जाणारा हा रोड असेल. फुलंब्री ते खुलताबाद ते वेरूळ या रोडचे काम झाल्यानंतर पर्यटन रिंग रोड म्हणून या रोडकडे पाहिले जाईल. मराठवाडा आणि आंध्र प्रदेश तसेच गुजरात, मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा रोड महत्त्वाचा ठरेल.
जयभवानीनगर येथील शिवाजी महाराज चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनपर्यंत रोडची मार्किंग आणि मोजणीचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत मोजणीचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे.
४रोडची भौगोलिक स्थिती आणि रुंदीकरणातील अडचणींची पूर्ण माहिती मार्किंग व मोजणीनंतर हाती येईल. जालना रोडची मार्किंग व मोजणी पूर्ण झाली आहे. बीड बायपास रोडची मार्किंगदेखील लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.