कुत्र्यांसाठी लावला चक्क पिंजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 00:03 IST2016-06-11T23:55:42+5:302016-06-12T00:03:34+5:30

औरंगाबाद : मानवी वस्त्यांमध्ये वाघ, बिबट्या यांसारख्या वन्यप्राण्यांनी घुसखोरी केल्यावर त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला जातो.

Chuck Cage for Dogs | कुत्र्यांसाठी लावला चक्क पिंजरा

कुत्र्यांसाठी लावला चक्क पिंजरा

औरंगाबाद : मानवी वस्त्यांमध्ये वाघ, बिबट्या यांसारख्या वन्यप्राण्यांनी घुसखोरी केल्यावर त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला जातो. पिंजऱ्यात अडकण्यासाठी त्यांना मांसाची लालूच दाखविली जाते. अगदी याच पद्धतीने चिकलठाणा विमानतळावर पिंजरा लावण्यात आला आहे; परंतु एखाद्या वन्यप्राण्यासाठी हा पिंजरा लावलेला नसून विमानतळाच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या मोकाट कुत्र्यांसाठी लावण्यात आला आहे.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीतून वाहणारी नाली आणि संरक्षक भिंतीजवळ बांधण्यात आलेल्या घरांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. विमानतळाच्या हद्दीतून वाहणाऱ्या तीन नाल्यांमुळे संरक्षक भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचतो, तर संरक्षक भिंतीजवळील अनेक घरांमधून थेट विमानतळाच्या हद्दीत घाण आणि कचरा टाकण्यात येत आहे. विमानतळाच्या भिंतीला लागूनच मांसाची विक्री केली जाते. विक्रीनंतर उरलेले मांसही भिंतीलगत टाकण्यात येते. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या शोधात परिसरातील कुत्री विमानतळाच्या हद्दीत घुसखोरी करीत आहेत. यातून अनेकदामोकाट कुत्री थेट धावपट्टीवर येतात. त्यामुळे विमानाच्या उड्डाणात अडथळा निर्माण होतो. यातून अपघाताचा धोका नाकारता येत नाही.
विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात वेळोवेळी महापालिकेकडे तक्रार केली आहे. महापालिकेच्या पथकाकडून मोकाट कुत्र्यांना पकडले जाते; परंतु हा प्रश्न कायम राहत आहे, अशा परिस्थितीत कुत्र्यांना पकडण्यासाठी थेट पिंजरा लावण्यात आला आहे. या पिंजऱ्यात कुत्री अडकण्यासाठी त्यामध्ये मांस ठेवले जाते. वन्यप्राण्यांप्रमाणे मोकाट कुत्री जेरबंद करण्याची वेळ येत आहे.
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच
औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये शुक्रवारी मोकाट कुत्र्यांनी १२ जणांचे लचके तोडले. या घटनेनंतरही शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. कुत्र्याने चावा घेतल्यामुळे शनिवारी घाटी रुग्णालयात ११ जण उपचारासाठी दाखल झाले. यामध्ये शहरातील विविध भागांतील ८ जणांचा समावेश आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातही लहान मुलांवर हल्ला होण्याचे प्रकार अधिक आहेत. पुंडलिकनगर, गजानननगर भागांमधील पाच जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. तर याच दिवशी अन्य भागातील ९ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. शुक्रवारच्या घटनेची शनिवारीही पुनरावृत्ती झाली. कुत्र्याने चावा घेतल्याने दिवसभरात ११ जण घाटी रुग्णालयात दाखल झाले. यामध्ये चिश्तिया कॉलनी, जयसिंगपुरा, एन-२, मुकुंदवाडी, चिकलठाणा, बजाजनगर येथील रुग्णांना समावेश होता.
शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसतात. येणारे-जाणारे पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या पाठीमागे ते लागतात. अशा वेळी दुचाकीचालकांकडून वेग अधिक केला जातो; परंतु या प्रयत्नात अपघात होण्याचेही प्रकार होत आहेत. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Chuck Cage for Dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.