आमदार निधी खर्चात चौगुले, मोटे आघाडीवर
By Admin | Updated: July 24, 2014 00:12 IST2014-07-24T00:06:36+5:302014-07-24T00:12:26+5:30
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद २०१३-१४ वर्षासाठी जिल्ह्यातील सर्वच आमदारांना २ कोटीपेक्षा अधिकचा निधी प्राप्त झाला होता.

आमदार निधी खर्चात चौगुले, मोटे आघाडीवर
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद
२०१३-१४ वर्षासाठी जिल्ह्यातील सर्वच आमदारांना २ कोटीपेक्षा अधिकचा निधी प्राप्त झाला होता. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सर्वच्या सर्व म्हणजे २ कोटी २० लाख ७८ हजार खर्च केले आहेत. तर आमदार राहुल मोटे यांनीही विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी वापरला. मोटे यांचे केवळ १ हजार रुपये समर्पित झाल्याने हे दोन आमदार निधी खर्चण्याच्या बाबतीत आघाडीवर राहिले आहेत.
उस्मानाबाद : २०१३-१४ वर्षासाठी जिल्ह्यातील सर्वच आमदारांना २ कोटीपेक्षा अधिकचा निधी प्राप्त झाला होता. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सर्वच्या सर्व म्हणजे २ कोटी २० लाख ७८ हजार खर्च केले आहेत. तर आमदार राहुल मोटे यांनीही विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी वापरला. मोटे यांचे केवळ १ हजार रुपये समर्पित झाल्याने हे दोन आमदार निधी खर्चण्याच्या बाबतीत आघाडीवर राहिले आहेत.
प्रत्येक आमदाराला दरवर्षी आमदार निधी मिळतो. या निधीतून रस्ते, समाज मंदिर, व्यायामशाळा, पाणीयोजना यासह इतर विकासकामे करता येतात. बहुतांश आमदारांचा निधी सभागृह व रस्त्यासाठी वापरला जात असला तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील पाचही आमदारांनी पाणीपुरवठा योजना, योजनेअंतर्गत सबमर्सिबल पंप बसविणे, ग्रामपंचायतींच्या विंधन विहिरीवर विद्युतपंप बसविणे आदी कामासाठीही प्राधान्याने निधी वापरल्याचे दिसून येते. आ. ज्ञानराज चौगुले यांना २०१३-१४ या वर्षासाठी २ कोटी २० लाख ७८ हजाराचा निधी प्राप्त झाला होता. यातील ६१ लाख ८४ हजाराचा निधी २०१२-१३ मधील अपूर्ण कामांसाठी त्यांनी वितरित केला. तर २०१३-१४ या वर्षात १ कोटी ५८ लाख ९४ हजार रुपये खर्चून सर्वच्या सर्व निधी विकास कामांवर खर्च केला. निधी खर्चण्यात राहुल मोटेही आघाडीवर राहिले. आ. मोटे यांना २०१३-१४ साठी २ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. २०१२-१३ मधील अपूर्ण कामासाठी ७७ लाख १६ हजाराची रक्कम खर्च केली तर २०१३-१४ मध्ये १ कोटी २२ लाख ८४ हजाराचा निधी विकास कामासाठी वितरित केला. २०१३-१४ मधील अवघे एक हजार रुपये समर्पित झाले आहेत. आ. ओम राजेनिंबाळकर यांनाही २ कोटींचा निधी २०१३-१४ साठी प्राप्त झाला होता. यातील ५४ लाख ३२ हजाराचा निधी २०१२-१३ या वर्षातील अपूर्ण कामासाठी वितरित करण्यात आला आणि २०१३-१४ या वर्षातील कामासाठी १ कोटी ४५ लाख ६८ हजाराचा निधी वितरित केला. त्यांच्या आमदार निधीतील सुमारे २ लाख १९ हजार समर्पित झाले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना २ कोटी ४४ लाख ५१ हजाराचा निधी २०१३-१४ या वर्षासाठी प्राप्त झाला होता. यातील २२ लाख ७६ हजार रुपये त्यांनी २०१२-१३ मधील अपूर्ण कामासाठी वितरित केले.
तर २०१३-१४ या वर्षात १ कोटी ३७ लाख ९३ हजाराचा खर्च त्यांनी विकास कामावर केला. मात्र त्यानंतरही त्यांच्या फंडातील ८३ लाख ३० हजार रुपये समर्पित झाले आहेत. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या आमदार फंडातील ५० लाख २१ हजार रुपयेही असेच समर्पित झाले आहेत. चव्हाण यांना २०१३-१४ या वर्षासाठी २ कोटी ४७ लाख ७ हजाराचा निधी प्राप्त झाला होता. यातील ४२ लाख ६५ हजार रुपये त्यांनी २०१२-१३ मधील अपूर्ण कामांसाठी वितरित केले. तर २०१३-१४ मधील कामासाठी १ कोटी ५४ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले.
विकास कामे उरकण्यासाठी जिल्हाभरात लगबग सुरू
आमदार फंडातील निधी समर्पित होण्यात राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत. याबाबत विचारले असता, पालकमंत्री चव्हाण यांनी पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कोट्यवधीचा अतिरिक्त निधी जिल्ह्यात आणला होता. त्यामुळे आमदार फंडातील निधी मुदतीत खर्च करता आला नाही, असे सांगितले. राणाजगजितसिंह पाटील यांनीही ग्रामविकास विभागाकडून सुमारे दहा कोटीचा अतिरिक्त निधी मिळवून विकास कामे केली. आमदार फंडातील निधीतील काही कामांना शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय मान्यता मिळाल्याने तो मार्चअखेर खर्च होऊ शकला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताही या कामांसाठी आडवी आल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक वर्षी आमदाराला २ कोटीचा स्थानिक विकास निधी मिळतो. हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करणे अपेक्षित असते. सर्वच आमदार या निधीतून विकास कामांचे नियोजन करून त्यास प्रशासकीय मान्यता घेतात. मात्र प्रत्यक्ष निधी ३१ मार्चपर्यंत खर्च न झाल्यास शिल्लक निधी शासनाकडे समर्पित होतो. मात्र या निधीतून करावयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असल्याने समर्पित झालेला निधी पुन्हा संबंधित कामासाठी जूनच्या सुमारास प्राप्त होतो.