सभापती निवडीतही ‘किस्मत का खेल’!
By Admin | Updated: September 23, 2014 23:42 IST2014-09-23T23:40:32+5:302014-09-23T23:42:52+5:30
बीड : चुरशीच्या ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवडीत नशिबाने आघाडीला तारले़ आता सभापतीपदांच्या निवडीतही ‘किस्मत का खेल’ पहावयास मिळणार आहे़

सभापती निवडीतही ‘किस्मत का खेल’!
बीड : २९- २९ अशा समान संख्याबळाने शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवडीत नशिबाने आघाडीला तारले़ आता सभापतीपदांच्या निवडीतही ‘किस्मत का खेल’ पहावयास मिळणार आहे़ इच्छुकांनी सभापती होण्यासाठी ‘लॉबिंग’ सुरु केले असून युती व आघाडीतही पेच आहे़
मिनीमंत्रालयाची सत्ता खेचण्यात आघाडीला यश आले असले तरी विभागांवर वर्चस्व मिळविण्यासाठी त्यांच्याकडे पूर्ण संख्याबळ नाही़ त्यामुळे चिठ्ठ्या टाकून सभापदाच्या निवडी होण्याचीच शक्यता अधिक आहे़
दरम्यान, विद्यमान सभापतींचा कार्यकाळ २ आॅक्टोबर २०१४ रोजी संपत आहे़ मुदतीतच सभापतींच्या निवडी करा, अशा शासनाच्या सूचना आहेत़ त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत मागे पडलेले आता सभापतीपदाचा मान मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू लागले आहेत़ त्यासाठी युती व आघाडीतील इच्छुकांनी ‘हायकमांड’कडे लॉबिंग सुरु केले आहे़
जलव्यवस्थापन समिती व स्थायी समिती परंपरेप्रमाणे अध्यक्षांकडेच राहील़ अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे या दोन्ही समित्यांवर थेट नियंत्रण राहील़ बांधकाम व अर्थ खाते उपाध्यक्षा आशा संजय दौंड यांच्याकडे जाईल़ शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन या विभागांचे सभापती होण्यासाठी इच्छुकांची गर्दी आहे़ महिला व बालकल्याण समितीवर महिला सदस्यांची हमखासच वर्णी लागणार आहे़ हे पद काबीज करण्यासाठी युती व आघाडीकडील महिला सदस्यांत जोरदार रस्सीखेच सुरु आहे़
दुसरीकडे समाजकल्याण विभागाच्या सभापतीपदावर अनुसूचित जाती- जमाती, विमुक्त जाती या प्रवर्गातील सदस्यांची हमखासच वर्णी लागते़ त्यामुळे या विभागाचे सभापतीपद मिळविण्यासाठी इच्छुकांनी दंड थोपटले आहेत़
त्यामुळे सभापतीपदांच्या निवडी देखील रोमांचक ठरणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़
फोडाफोडीची शक्यता कमी!
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडीत युती व आघाडीच्या नेत्यांनी आपले शिलेदार सांभाळले़ त्यामुळे ऐनवेळी फोडाफोडीचे राजकारण झाले नाही़ आता सभापतीपदाच्या निवडी आहेत़ त्यामुळे सभापतीपदासाठी कुरघोडीचे राजकारण होण्याची शक्यता कमीच आहे़ चिठ्ठ्या टाकून निवडी होतील, असे चित्र आहे़ (प्रतिनिधी)