जन्मदात्यानेच केले चिमुकल्याचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:02 IST2021-08-22T04:02:07+5:302021-08-22T04:02:07+5:30
रांजणगावातील घटना: बाळाच्या विरहाने आईची पोलिस ठाण्यात धाव रांजणगावातील घटना : बाळाच्या विरहाने हतबल आईची पोलीस ठाण्यात धाव वाळूज ...

जन्मदात्यानेच केले चिमुकल्याचे अपहरण
रांजणगावातील घटना: बाळाच्या विरहाने आईची पोलिस ठाण्यात धाव
रांजणगावातील घटना : बाळाच्या विरहाने हतबल आईची पोलीस ठाण्यात धाव
वाळूज महानगर : पत्नीला मारहाण करून जन्मदात्यानेच आपल्या तीन महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि. २१) सकाळी ११ वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. पोटच्या गोळ्याला पित्याने पळविल्याने बाळाच्या विरहाने हतबल झालेल्या मातेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती कथन केली.
अपर्णा गाडेकर (रा. डोंगरगण, ता. जि. अहमदनगर) हिने दोन वर्षांपूर्वी गावातील संदीप दिलीप कदम याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. या दोघांचा सुखात संसार सुरू असताना पती संदीप हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा निघाला आणि त्याने पत्नी अपर्णा हिचा छळ सुरू केला. मात्र, आई-वडील व नातेवाइकांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केल्याने अपर्णा पतीचा अन्याय सहन करीत होती. दरम्यानच्या कालावधीत संदीपच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्या असून, त्याच्याविरुद्ध अहमदनगर पोलीस ठाण्यात ५ ते ६ गुन्हे दाखल झाले आहेत. अशातच तिला दिवस गेले. तीन महिन्यांपूर्वी २७ मे रोजी अपर्णाने गोंडस बाळाला जन्म दिला. मुलगा झाल्यानंतर आनंदित झालेल्या संदीपने दोन महिन्यांपूर्वी पत्नी अपर्णा व बाळाला सोबत घेऊन वाळूज एमआयडीसीत रोजगाराच्या शोधात आला. रांजणगावात किरायाच्या (भाड्याच्या) घरात राहणारा संदीप बांधकाम मिस्त्री म्हणून काम करू लागला. पती-पत्नीने धूमधडाक्यात बाळाचे नामकरण करून त्याचे नाव सिद्धार्थ ठेवले.
पत्नीला मारहाण करून बाळ पळविले
अलीकडे काही दिवसांपासून संदीपने पत्नीला मारहाण करून त्रास देण्यास सुरुवात केली. पतीकडून होणारा त्रास असह्य झाल्याने अपर्णाने आई सुजाता गाडेकर यांना या प्रकाराची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर तिची आई शुक्रवारी (दि. २०) रांजणगावात आली. रात्री मुक्काम केल्यानंतर सुजाता गाडेकर यांनी जावई संदीप यास समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जावई संदीप हा अरेरावी करीत असल्याने शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुलगी व नातवाला सोबत घेऊन त्या डोंगरगण येथे जाण्यासाठी निघाल्या. पत्नी माहेरी जात असल्याने संतप्त झालेल्या संदीपने रिक्षाचा पाठलाग करून रांजणगाव फाट्यावर रिक्षा अडवली. पत्नी व सासूसोबत झटापट करून चिमुकल्या सिद्धार्थला हिसकावून तो पळून गेला.
अपर्णा हिने आईला सोबत घेऊन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून घडलेली घटना कथन केली. पोलीस अधिकाऱ्यांनी तिला धीर देत संदीपच्या मोबाइलवर संपर्क साधत बाळाला घेऊन परत ये, असे सांगितले. मात्र, संदीपने फोन कट केल्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
मातेला सोबत घेऊन भरपावसात पोलिसांची शोधमोहीम
या प्रकरणाची माहिती पोलीस बंदोबस्तासाठी शहरात गेलेले पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना मिळताच त्यांनी तत्काळ संदीपचा शोध घेण्याचे आदेश बजावले. उपनिरीक्षक निर्वळ यांनी अपर्णा व तिची आई सुजाता यांना सोबत घेऊन सहकाऱ्यांच्या मदतीने भरपावसात वाळूज औद्योगिक परिसर पिंजून काढला. दरम्यान, संदीपने बाळाला बाटलीने दूध पाजत असल्याचे फोटो पत्नीच्या मोबाइलवर पाठवून फोन बंद करून टाकला.
फोटो क्रमांक- संदीप सोबत चिमुकला सिद्धार्थ
---------------------------