मुलाचा गळा घोटला, मुलीचा गळा चिरला, मातेचा कोळसा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2016 00:05 IST2016-08-13T00:02:09+5:302016-08-13T00:05:16+5:30
औरंगाबाद : आमखास मैदान परिसरातील गुलाबवाडी भागातील एका घरात शुक्रवारी सायंकाळी थरार घटना उघडकीस आली. घरात महिलेचे जळून कोळसा झालेले प्रेत पडले होते,

मुलाचा गळा घोटला, मुलीचा गळा चिरला, मातेचा कोळसा!
औरंगाबाद : आमखास मैदान परिसरातील गुलाबवाडी भागातील एका घरात शुक्रवारी सायंकाळी थरार घटना उघडकीस आली. घरात महिलेचे जळून कोळसा झालेले प्रेत पडले होते, तर बाजूलाच तिच्या एक महिन्याच्या चिमुरड्या मुलाचा गळा दाबून खून करण्यात आला होता. शिवाय तीन वर्षीय मुलीचाही गळा चिरलेला असल्याने तीही रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेली होती... मातेनेच काही तरी कारणावरून ही हत्या आणि आत्महत्याकांड घडवून आणले की तिऱ्हाईत आरोपीने हे हत्याकांड घडविले, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रमिला सचिन गायकवाड (२५, रा. गुलाबवाडी) व प्रफु ल्ल (वय १ महिना) अशी या घटनेत मरण पावलेल्या
माय-लेकाची नावे आहेत. मुलगी सोनाक्षी (३) ही सध्या घाटीत मृत्यूशी झुंज देत आहे.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आमखास मैदान, टाऊन हॉल परिसरातील कमल तलावाशेजारी असलेल्या गुलाबवाडी येथे सचिन गायकवाड हे पत्नी प्रमिला, मुलगी साक्षी, मुलगा प्रफुल्ल आणि आईसह राहतो. सचिन गायकवाड हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. तर त्याची आई घाटी परिसरातील एका ठिकाणी घरकाम करते. शुक्रवारी सकाळी १० वाजता सचिन गायकवाड हा आपल्या हर्सूल येथे राहणाऱ्या भावासोबत मजुरीसाठी गेला. तर त्यांची आई घरकामाला निघून गेली. घरी प्रमिला व तिची दोन मुले होती.
घरातून वास आल्याने...
सायंकाळी गायकवाड यांच्या खोलीतून काही तरी जळाल्याचा वास येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेजाऱ्यांनी येऊन दरवाजा लोटला. तेव्हा घरातील चित्र पाहून सगळ्यांनाच धक्काा बसला. घरात प्रमिलाचा जळून कोळसा झालेला होता. बाजूलाच तिचा चिमुकला प्रफुल्ल निपचित पडलेला होता आणि सोनाक्षी रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेली होती. हे चित्र पाहून शेजारी हादरून गेले. त्यांनी तात्काळ सचिन गायकवाड यांना फोन केला. काही क्षणाच सचिन भावासोबत घरी धावत-पळत आला. तोपर्यंत घटनेची माहिती बेगमपुरा ठाण्यात समजली होती. लागलीच सोनाक्षी आणि प्रफुल्लला त्यांनी दुचाकीवर घाटीत नेले. मग पोलीसही पोहोचले. पोलिसांनी प्रमिलाचे कोळसा झालेले प्रेत घाटीत आणले.
घटना समजताच प्रमिलाचा मृतदेह घाटीत हलविल्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळाला कुलूप लावले. नंतर निरीक्षक शेख सलीम आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी दहा बाय दहाच्या दोन खोल्यांच्या या घरातून रॉकेलचा आणि मृतदेह जळाल्याचा उग्र वास येत होता. घटनास्थळी रक्ताचे थारोळे पडलेले होते. आतील खोलीत रॉकेलची अर्धी रिकामी झालेली कॅन, एक कोयता पडलेला होता.
शेजारी म्हणतात, गायकवाड कुटुंब खूप चांगले
सचिन गायकवाड यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी सदर प्रतिनिधीस सांगितले की, प्रमिला हिचे तिचे पती अथवा सासूसोबत चार वर्षात कधीही कधीही भांडण झाले नाही. शिवाय या घटनेच्या वेळी त्यांच्या घरातून आवाजही बाहेर आला नाही. त्यामुळे ही घटना आमच्यासाठी धक्कादायक आहे. ही घटना घडली तेव्हा घरी केवळ प्रमिला आणि तिचे चिमुकलेच होते, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.
झोका झाला पोरका...
प्रमिला आणि सचिन यांनी आपल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासाठी घरात एक झोका बांधलेला होता.
४आजच्या घटनेत एक महिन्याच्या प्रफुल्लचा खून करण्यात आल्याने हा झोका पोरका झाल्याचे दिसत होते.
४रिकामा झोका पाहून पोलीस अधिकारी आणि शेजाऱ्यांचे मन हेलावले...
खून की हत्येनंतर आत्महत्या?
चिमुकल्या प्रफुल्लचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. तर सोनाक्षीचा धारदार शस्त्राने गळा चिरलेला असल्याचे आढळून आले आहे.
सोनाक्षीवर घाटीत उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. प्रमिलाचा तर अक्षरश: जळून कोळसा झालेला आहे. हा नेमका खुनाचा प्रकार आहे का, हे गूढ आहे.
प्रमिलाने काही तरी कारणावरून आपल्या मुलांचा जीव घेऊन नंतर स्वत: जाळून घेऊन आत्महत्या केली की तिऱ्हाईत आरोपीने हे हत्याकांड घडवून आणले, या दोन्ही बाजूंनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
रात्री उशिरापर्यंत पोलीस कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचले नव्हते, असे पोलीस निरीक्षक शेख सलीम यांनी सांगितले.