आई-वडिलांच्या विसंवादामुळे मुलं होताहेत ‘मुडी’

By Admin | Updated: February 9, 2015 00:43 IST2015-02-09T00:38:38+5:302015-02-09T00:43:54+5:30

विशाल सोनटक्के ,उस्मानाबाद बदलत्या काळात विविध कारणांमुळे पती-पत्नीतील विसंवाद वाढत आहे. यातून घरात होणाऱ्या कुरबुरींचा परिणाम चिमुकल्यांना निष्कारण भोगावा लागत आहे.

Children are 'Mudi' due to parents' dissonance | आई-वडिलांच्या विसंवादामुळे मुलं होताहेत ‘मुडी’

आई-वडिलांच्या विसंवादामुळे मुलं होताहेत ‘मुडी’



विशाल सोनटक्के ,उस्मानाबाद
बदलत्या काळात विविध कारणांमुळे पती-पत्नीतील विसंवाद वाढत आहे. यातून घरात होणाऱ्या कुरबुरींचा परिणाम चिमुकल्यांना निष्कारण भोगावा लागत आहे. काही बोलता येत नसले तरी घरातील वातावरण समजणारी, अनुभवणारी ही मुले यामुळेच कमालीची ‘मुडी’ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आई-वडीलांच्या नात्यातील कडवटपणा बघून ही मुलेही भावनाशून्य होत असून, पर्यायाने या लेकरांमधील जिव्हाळा लोप पावत चालल्याची मानसिक विकृती पुढे येत आहे. विशेष म्हणजे देवाघरच्या फुलाप्रमाणे मुलांकडे पाहणाऱ्या समाजाचेही या नव्याने निर्माण होत असलेल्या गंभिर समस्येकडे दूर्लक्ष होत आहे.
लहानग्यांच्या शाळाबाबत पालक अधिक जागरुक झाल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच अगदी ग्रामीण भागातही नर्सरी, केजी, सिनिअर केजी च्या प्रवेशासाठीही पालकांची धावपळ सुरु असते. या शाळा किती दर्जेदार आहेत. तिथे कोणते मेडिअम, कोणता सिलॅबस आहे. स्टाफसह शाळेची इमारत, सोयी-सुविधा या बाबी पाहून पालक चिकित्सक वृत्तीने मुलांचा प्रवेश घेतात. मात्र स्वतांचे पालकत्व आणि घरातील मानसिक स्वास्थाचा दर्जा याकडे मात्र ढुकूंनही पहात नाही. याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. महेश कानडे म्हणाले की, मुलं आई-वडीलांकडे पाहून सगळ्या बाबी शिकत असतात. आई-वडीलांमध्ये तणावाचे संबंध असतील तर त्याचा परिणाम या चिमुकल्यांच्या मानसिकतेवरही होतो. अलिकडील काळात मुलं खुप हट्टी, मुडी झालीत, असं आपण सातत्याने ऐकतो. खरे तर आई-वडीलांच्या नात्यातील कडवटपणा या मुलांमध्ये आलेला असतो. आज मुडी वाटणाऱ्या या मुलांमध्ये घरच्या या वातावरणामुळे जाणीव, जिव्हाळा राहत नाही. घरातील परिस्थिती अशीच राहिल्यास मुले पुढे निष्ठूर होतात. व्यसनाच्या आहारी जातात. मानसिक विकारांचे बळी पडतात. पर्यायाने अभ्यासाकडे त्यांचे दूर्लक्ष होते. त्यामुळे मुलांच्या या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देण्याची वेळ आल्याचे डॉ. कानडे यांनी सांगितले.
येथील पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरातील लोकप्रतिष्ठान समुपदेशन केंद्राकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा अभ्यास करता, पती-पत्नीतील दुरावा चिमुकल्या मुलांसाठी मोठी समस्या बनला आहे. विशेष म्हणजे पती-पत्नीतील समस्या सोडविण्यासाठी किमान तालुका पातळीवर एखादे समुपदेशन केंद्र आहे. मात्र, अशा पीडित कुटूंबातील मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली आहे. नवरा-बायकोतील भांडणाचा फटका निरागस मुलांना बसतोय याची जाणीव कुणालाही नसल्याचे विदारक चित्र आहे.
समाजात मुलांचे हक्क, अधिकार, समस्या आणि मानसिक आरोग्य याबाबत जनजागृतीचा अभाव असल्याचेही या अभ्यासातून पुढे आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलां-मुलींची होणारी हेळसांड, मानसिक कुचंबना ही गृहीत धरली जात नाही. त्यामुळेच मुलांसंदर्भात समुपदेशन केंद्राकडे तक्रारीच येत नसल्याचे येथील समुपदेशक धनवडे यांनी सांगितले.
बदलत्या काळात स्त्री शिक्षणामुळे स्त्रीयांच्या जाणिवा आणि आकांक्षा बदलल्या आहेत. त्यांनाही आपले करिअर महत्त्वाचे वाटू लागले आहे. नुसत्या कर्तव्य पालनाबरोबर हक्क आणि मोकळेपणाही हवासा वाटत आहे. याबरोबरच शिक्षण आणि इतर बाबींमुळे सगळ्या प्रकारचे निर्णय आपण घेऊ शकतो, हा आत्मविश्वासही त्यांच्यामध्ये आला आहे. हे ज्यांना समजलेले नाही, आणि स्वीकारता आलेले नाही, तिथे नवा संघर्ष निर्माण होत आहे. ज्यांनी हे समंजसपदे स्वीकारलेले आहे, तिथे प्रश्न कमी येतात आणि काही समस्या निर्माण झाली तरी सुसंवादाने ती सुटते. पारंपारिक विचार पध्दती बदलल्यास याबाबतचे प्रश्न कमी होतील.
- डॉ. स्मीता शहापूरकर, अध्यक्ष, लोकप्रतिष्ठान संस्था
पती आणि पत्नी या दोघांनीही एकमेकांतील भेद-वैशिष्ट्ये समजून घ्यायला हवीत. एवढच नव्हे तर भेद-वैशिष्ट्यांचा जाणिवपूर्वक आणि प्रेमादराने स्वीकार करायला शिकलं पाहिजे. सुसंवादासाठी पुरुष आणि स्त्रि दोघांनीही एकमेकांमधील वेगळेपणा आणि फरक याचा आदर करायला हवा. त्याचा स्वीकार करायला हवा. अशा परस्परपूरक आदराच्या वातावरणातच दोघांतील नाजूक नात्याला मजबूती येवू शकते. पुरुष स्त्रिला तिच्या समस्येवर पटकन उपाय सांगून तिच्या भावना अमान्य करतो किंवा चुकीच्या ठरवतो तर स्त्रीशी पुरुषाला न मागता सल्ला देते. या बाबी दोघांनीही टाळून स्वत:मध्ये बदल करायला शिकण्याची गरज आहे.
- डॉ. महेश कानडे, मानसोपचार तज्ज्ञ, उस्मानाबाद.

Web Title: Children are 'Mudi' due to parents' dissonance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.