तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले मुलाला पण वृध्दापकाळी घरातून हाकलून दिले हो आम्हाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:05 IST2020-12-29T04:05:06+5:302020-12-29T04:05:06+5:30
बापू सोळुंके औरंगाबाद: तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले मुलाला पण वृध्दापकाळी घरातून हाकलून दिले हो आम्हाला... पोलिसांकडे ही तक्रार केलीय एका ...

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले मुलाला पण वृध्दापकाळी घरातून हाकलून दिले हो आम्हाला...
बापू सोळुंके
औरंगाबाद: तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले मुलाला पण वृध्दापकाळी घरातून हाकलून दिले हो आम्हाला... पोलिसांकडे ही तक्रार केलीय एका ज्येष्ठ नागरिकाने. आणखी एक तक्रार अशीच आहे... आम्ही वृध्दापकाळाने थकलो आहोत, आमच्याकडून काम होत नाही, त्यामुळे सून आणि मुलगा मारहाण करतो, घरातून हाकलून देतात...
ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या १०९० या टोल फ्री क्रमांकावर आणि पोलीस नियंत्रण कक्षाला अशा पद्धतीने वृद्धांचे फोन आले आहेत. बहुतेक तक्रारींचा सूर हा कुटुंबात आता कोणतेच स्थानच उरले नाही असाच आहे. मुलगा आणि सून यांच्याबद्दलच्या तक्रारी ऐकून पोलीसही गलबलून जातात. या तक्रारींची दखल घेऊन नंतर तक्रारदारांच्या मुलांना, सुनांना आणि नातेवाईकांना बोलावून प्रथम त्यांचे समुपदेशन केले जाते आणि कायद्याची भाषाही समजावून सांगितली जाते.
आई किंवा वडिलांच्या नावावर असलेले घर मुलांच्या नावावर झाल्यानंतर ज्येष्ठांना घरातून त्रास होत असल्याचे या तक्रारींतून समोर येते. मुलगा आणि सून किंवा अगदी मुलगी आणि जावईसुद्धा पाहत नाहीत, अशा स्वरूपाच्या या तक्रारी असतात. त्रास असह्य झाल्यावर वृध्द मंडळी अथवा त्यांचे शेजारी पोलिसांना कॉल करतात. पोलीस आयुक्तालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी १०९० ही टोल फ्री टेलीफोन सेवा उपलब्ध केली आहे. या क्रमांकावर आणि औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला ज्येष्ठांचे दररोज तीन ते चार कॉल येतात. मुलगा आणि सून हे उठताबसता शिव्या देतात, मारहाण करतात, घरातून हाकलून देतात, शिळे अन्न खाऊ घालतात अथवा जेवायला देत नाहीत, अशा स्वरूपाच्या या तक्रारी आहेत.
केस क्रमांक १
तरुण मुलगा सतत मारहाण करतो
सतत भांडण करणाऱ्या तरुण मुलाची पत्नी माहेरी निघून गेली. माझी बायको तुझ्यामुळेच निघून गेली असे म्हणून शहरात अधिकारी असलेला मुलगा ५५ वर्षीय आईला मारहाण करतो. त्याला अनेकदा समजावून सांगितल्यावरही त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. शेवटी आई वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी त्यांच्या मुलाला फोन करुन बोलावले मात्र तो आला नाही. शेवटी पोलीस त्याच्या घरी गेले. त्याला जीपमध्ये कोंबून पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर केले.
केस क्रमांक २
घटस्फोटित सून घर सोडत नाही
सासरच्या मंडळीसोबत पटत नाही म्हणून तिने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत छळाची तक्रार नोंदविली. नंतर तिने पतीपासून घटस्फोट घेऊन ती विभक्त झाली. मात्र, तिने सासरचे घर सोडले नाही. आता ती आम्हाला त्रास देत आहे. यामुळे तिला घरातून काढा आणि आम्हाला त्रासातून मुक्त करा, अशी तक्रार वृद्ध जोडप्याने पोलिसांकडे केली.
कोट
समुपदेशन आणि कायद्याची माहिती दिली जाते
ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या स्वतंत्र सेलमध्ये हवालदार एल. जे. देवकर आणि महिला कॉंस्टेबल पठाण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. ज्येष्ठ नागरिकाची तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांची सून आणि मुलाला बोलावून त्याचे समुपदेशन केले जाते. यानंतरही ते ऐकत नसतील तर ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्याची माहिती त्यांना दिली जाते. तेव्हा बहुतेक मुले आणि सुना त्यांचा सांभाळ करण्यास तयार होतात.
- किरण पाटील, भरोसा सेल, पोलीस आयुक्तालय.