चिकलठाणा विमानतळाला ‘उडान’मधून वगळले; छोट्या शहरांशीही कनेक्टिव्हिटी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:58 IST2018-02-10T14:58:26+5:302018-02-10T14:58:49+5:30
केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश नसल्याचा फटका औरंगाबाद शहराला बसत आहे. एकीकडे मोठ्या विमान कंपन्यांकडे विमान उपलब्ध नाही. तर दुसरीकडे ‘उडान’ योजनेअभावी छोट्या विमानांद्वारे तासाभराच्या अंतरावरील शहरांबरोबरही हवाई कनेक्टिव्हिटी मिळत नाही.

चिकलठाणा विमानतळाला ‘उडान’मधून वगळले; छोट्या शहरांशीही कनेक्टिव्हिटी मिळेना
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश नसल्याचा फटका औरंगाबाद शहराला बसत आहे. एकीकडे मोठ्या विमान कंपन्यांकडे विमान उपलब्ध नाही. तर दुसरीकडे ‘उडान’ योजनेअभावी छोट्या विमानांद्वारे तासाभराच्या अंतरावरील शहरांबरोबरही हवाई कनेक्टिव्हिटी मिळत नाही. परिणामी नव्या विमानसेवा जमिनीवरच राहत
आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने वर्षभरापूर्वी ‘उडान- उडे देश क ा आम नागरिक ’ ही योजना सुरू केली. यामध्ये अधिक विमानसेवा नसणार्या विमानतळांवरून एक तासाच्या आतील अंतरावरील शहरांसाठी २,५०० रुपयांत विमानसेवा देण्यास सुरुवात झाली. देशभरासह महाराष्ट्रातील नांदेड, शिर्डीसह इतर शहरांचा समावेश झाला. या योजनेमुळे बंद असलेली आणि नव्याने सुरू झालेली विमानतळे विमान कंपन्यांना खुणावत आहे. औरंगाबादपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शहरांतील विमानतळे गजबजू लागली आहेत. नांदेड, शिर्डी विमानतळावरून हे चित्र स्पष्ट होत आहे. ‘उडान’मध्ये काही केल्या औरंगाबाद विमानतळाचा समावेश होत नाही. त्यामुळे औरंगाबाद शहर नव्या शहरांबरोबर हवाई सेवेने जोडल्या जात नाही.
ट्रूजेट कंपनीने २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू केली. परंतु त्यानंतर नव्या विमानसेवेची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे. एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीच्या विमानसेवेने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई कनेक्टिव्हिटी आहे. कंपन्यांकडे सध्या मोठी विमाने उपलब्ध नाहीत. कंपन्यांना ही विमाने प्राप्त होताच औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू होईल, असे सांगितले जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘उडान’ योजनेत औरंगाबादचा समावेश करण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे.
या विमानसेवेची गरज
‘उडान’ योजनेनुसार तासाभराच्या अंतराचा विचार केला तर मुंबई, गोवा, पुणे, नांदेडसह अन्य शहरे जोडली जाऊ शकतात. शिवाय सुरतहून शिर्डीसाठी विमान सुरू होऊ शकते, तर औरंगाबादला का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबरोबर औरंगाबादहून दिल्ली आणि मुंबईसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे. देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी जयपूर- उदयपूर- दिल्ली विमान, तसेच बंगळुरू, चेन्नई, अहमदाबादसह बुद्धिस्ट सर्किटशी औरंगाबाद शहर विमानसेवेने जोडले जाण्याची प्रतीक्षा आहे. नव्या विमानसेवेसाठी औद्योगिक, पर्यटन शहरे, बुद्धिस्ट सर्किटला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.
जानकार म्हणतात...
समावेश व्हावा
मोजक्याच विमानसेवेमुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम होत आहे. त्यामुळे विमानसेवेत वाढ होण्याची गरज आहे. यासाठी ‘उडान’ योजना महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे या योजनेत औरंगाबादचा समावेश झाला पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला पाहिजे. आमच्याकडूनही नियमितपणे प्रयत्न केले जात आहेत.
- हरप्रीतसिंग नि-ह, अध्यक्ष, औरंगाबाद हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन
योजना आवश्यक
मुंबईला जाण्यासाठी अनेकदा दहा हजार रुपयांपर्यंत तिकीट दर आकारले जातात. त्यामुळे किफायतशीर विमान प्रवासासाठी ‘उडान’ योजना आवश्यक आहे. मुंबई, पुणे, गोवा आदी शहरांना विमानसेवेने औरंगाबाद जोडण्यासाठी हे फायद्याचे ठरेल. या योजनेत समावेश झाला तर विमानतळालाही निश्चित फायदा होईल.
- जसवंतसिग, अध्यक्ष, टुरिझम प्रमोटर्स गिल्ड