चिकलठाण्याहून ६० देशांत होईल मालाची निर्यात
By Admin | Updated: December 22, 2015 23:54 IST2015-12-22T23:14:23+5:302015-12-22T23:54:09+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून एअर कार्गो सेवा सुरू झाल्यानंतर शहरातून हवाई सेवेने आखाती देशांबरोबर तब्बल ६० देशांमध्ये कमीत कमी वेळेत शेती मालाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार आहे.

चिकलठाण्याहून ६० देशांत होईल मालाची निर्यात
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर कार्गो सेवा सुरू झाल्यानंतर शहरातून हवाई सेवेने आखाती देशांबरोबर तब्बल ६० देशांमध्ये कमीत कमी वेळेत उद्योग, शेती व्यवसायातील मालाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार आहे. देश-विदेशांत मालाची निर्यात करण्यासाठी औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्रासाठी एअर कार्गो सेवा एक प्रकारे वरदान ठरणार आहे. या सेवेमुळे कमीत कमी वेळेत मालाची निर्यात करून औरंगाबाद शहर आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी भरारी घेणार आहे.
केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे. त्यामुळे चिकलठाणा विमानतळावरून बहुप्रतीक्षित एअर कार्गोची सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. देशांतर्गत एअर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रियाही आता पूर्ण झाली असून, दिल्ली येथील एजन्सीला त्याचे कंत्राट मिळाले आहे. जानेवारीत ही सेवा सुरू होणार आहे, तर आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा विमानतळ प्राधिकरण स्वत: हाताळणार असून, मार्चपर्यंत ही सेवाही सुरू होईल.
जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा लेणी, शहरातील पर्यटनस्थळांबरोबर परिसरातील औद्योगिक क्षेत्रामुळेही औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.
आॅटोमोबाईल्स, कृषी उत्पादने, फार्मासह विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या औरंगाबादलगतच्या औद्योगिक वसाहतींमध्ये आहेत. आजघडीला या कंपन्या रेल्वे आणि रोड ट्रान्सपोर्टद्वारे मुंबई, दिल्ली येथून देश-विदेशांमध्ये मालाची निर्यात करतात; परंतु अशा प्रकारे मालाच्या निर्यातीमध्ये अधिक वेळ जातो. अशाच प्रकारे शेतीमालाचीही निर्यात होते. मात्र, एअर कार्गो सेवेमुळे कमीत कमी वेळेत या मालाची निर्यात होण्यास हातभार लागणार असल्याने निर्यातदारांचा हा त्रास कायमचा थांबणार आहे.
नाशवंत पदार्थांसाठी फायदेशीर
फळे, भाज्या अशा शेतीमालाचीही देश-विदेशांत निर्यात केली जाते. फळे, भाज्या हा नाशवंत माल असतो. हा माल कमीत कमी वेळत निश्चित ठिकाणी पोहोचणे गरजेचे असते; अन्यथा हा माल पोहोचेपर्यंत खराब होतो. रस्ते वाहतुकीद्वारे अनेकदा या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचा आर्थिक फटका निर्यातदारांना सहन करावा लागतो. त्यामुळे अशा नाशवंत मालाची निर्यातीसाठी एअर कार्गो सेवा सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे.